सुरेल आवाजातून तयार केली स्वत:ची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:06+5:302021-08-23T04:27:06+5:30

प्रा. राजेंद्र पाटील प्रयाग चिखली : पाडळी बुद्रुकमधील जन्मजात अंध असलेल्या तरुणाने आपल्या आवाज आणि कलेतून स्वत:ची ...

Self-identity created by a melodious voice | सुरेल आवाजातून तयार केली स्वत:ची ओळख

सुरेल आवाजातून तयार केली स्वत:ची ओळख

Next

प्रा. राजेंद्र पाटील

प्रयाग चिखली : पाडळी बुद्रुकमधील जन्मजात अंध असलेल्या तरुणाने आपल्या आवाज आणि कलेतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रणय बेलेकर या तरुणाने संगीत शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत संगीत शिक्षक, वादक, गायक बनून तरुणांना एक आदर्श निर्माण केला आहे. तो गायला लागला की लोक भान हरपून जातात.

पाडळी बुद्रुकमधील आंबेडकरनगरमध्ये गरीब कुटुंबांमध्ये प्रणयचा जन्म झाला. जन्मानंतर दोन वर्षांतच त्याला दिसत नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. घरची परिस्थिती हलाखीची असूनही वडील दौलू बेलेकर यांनी अनेक नेत्रतज्ज्ञांची भेट घेतली, पण त्याचा उपयोग झाला नाही. प्रणयच्या डोळ्यातील नसा दबलेल्या असल्यामुळे डोळ्याच्या पडद्याला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे त्याला कधीही दिसणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. आपल्या मुलाच्या शरीरातील उणिवेमुळे त्याला आयुष्याचा आनंद घेता येणार नाही ही कल्पना त्याच्या वडिलांना स्वस्थ बसू देत नव्हती. प्रणयला बालपणापासूनच संगीताची आवड, वडिलांनी त्याला मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधन या अंध शाळेमध्ये दाखल केले. या शाळेतील शिक्षक गौतम कांबळे व संगीतमय वातावरणामुळे प्रणयमधील कलाकार आकार घेऊ लागला. या ठिकाणी तो मिळेल ते वाद्य वाजवायचा, गायन करायचा. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने अहिल्याबाई होळकर या शाळेमध्ये, तर आठवी ते दहावी शिक्षण विकास हायस्कूलमधून पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागातून हार्मोनियम डिप्लोमा पूर्ण केला. पुढे विवेकानंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन हिंदीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. युथ फेस्टिव्हलमध्ये त्याचा नेहमी प्रथम क्रमांक यायचा. कॉलेजमध्ये असताना गझलांचे कार्यक्रम विविध कॉलेजमध्ये तो आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर सादर करायचा. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ललित कला केंद्र पुणे येथे प्रवेश परीक्षा दिली व त्याची निवड देखील झाली. हार्मोनियममधून संगीत शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत संगीत विशारद पदवी मिळवली, तसेच गांधर्व विद्यालय मुंबईमधून गायनाची पदवी घेतली. शिक्षण घेत असताना तो गायनाचे कार्यक्रम करत वडिलांना हातभार लावायचा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण मिळावे या उद्देशाने वरणगे पाडळीमध्ये स्वरसाज हा संगीत वर्ग सुरू केला आहे.

भविष्यामध्ये शॉर्ट फिल्म, संगीत दिग्दर्शन व गायन या ध्येयाबरोबर अंध मुलांबद्दल लोकांच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अंध मुलांच्या बरोबर वागत असताना लोक अंतर ठेवून वागतात. त्यावर शॉर्टफिल्म, तसेच डॉक्युमेंट्री बनवायचा त्याचा मानस आहे.

एखाद्या निराश व्यक्तीला समुपदेशनाच्या द्वारे नैराश्यातून बाहेर काढेन असे तो जेव्हा आत्मविश्वासाने सांगतो तेव्हा आपल्यासारख्यांचा डोळसपणाही त्याच्या समोर खुजा ठरतो. लोक अंध आहे म्हणून सहानुभूती दाखवतात, पण मदत करायच्या वेळी दूर जातात म्हणून.I don't want sympathy, I want opportunity .. असे प्रणय म्हणतो.

Web Title: Self-identity created by a melodious voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.