केलेल्या कामाचे बील देण्यास टाळाटाळ, ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न; कोल्हापूर महापालिकेत घडला प्रकार
By भारत चव्हाण | Published: November 30, 2023 07:31 PM2023-11-30T19:31:38+5:302023-11-30T19:31:56+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात बागल चौक येथील कब्रस्तानमध्ये केलेल्या कामाचे वीस लाखाचे बील देण्यास महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे अरुण ...
कोल्हापूर : कोरोना काळात बागल चौक येथील कब्रस्तानमध्ये केलेल्या कामाचे वीस लाखाचे बील देण्यास महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे अरुण नारायण जगधने या ठेकेदाराने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महापालिका चौकात घडल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या व्यक्तीस आत्मदहन करण्यापासून रोखले आणि अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या समोर उभे केले. त्यानंतर बील अदा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राजेंद्रनगर न्यू वसाहत येथे राहणाऱ्या अरुण जगधने यांना महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तत्कालिन शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता बाबुराव दबडे या तिघांनी बागल चौक येथील कब्रस्तानमध्ये एक काम दिले होते. कोरोना काळात मुस्लिम व्यक्तींचे मृतदेह दफन करण्याकरिता दोन एकर जागेत मुरुमाचा भराव टाकून तसेच तेथे असलेली एक छोटी खण मुजविण्यासह कब्रस्तानमध्ये मुरुमाचे रस्ते तयार करण्याचे हे काम होते.
सगळीकडे लॉकडाऊन असताना जगधने यांनी दहा कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन रात्रंदिवस हे काम पूर्ण केले. कामाचे बील देण्याची जेंव्हा विनंती करायला लागले तेंव्हा जगधने यांना टाळण्यात येऊ लागले. नंतर झालेल्या कामाची निविदा प्रसिध्द झाली. त्यावेळी जगदणे यांनी हे काम मी केले आहे, असे सांगितले, तेंव्हा त्यांनाही निविदा भरण्यास सांगण्यात आले.
परंतू जगधने हे महापालिकेचे अधिकृत ठेकेदार नसल्याने निविदा भरता आली नाही. दरम्यानच्या काळात आयुक्त कलशेट्टी, सरनोबत यांची बदली झाली तर दबडे निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचे बील देण्यास टाळाटाळ होऊ लागली. गेली अडीच वर्षे ते बीलासाठी पाठपुरावा करत असताना अलिकडेच जगदणे यांना या कामाचे बील अन्य चार ठेकेदारांनी परस्पर उचलले असल्याचे निदर्शनास आले.
काही अधिकाऱ्यांनी त्यांना यातून मार्ग काढूया, ज्यांनी बील उचलले आहे, त्यांना पैसे देण्यास सांगूया असे सांगण्यात येत होते. काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र जगधणे यांनी बायकोचे दागिणे गहाण ठेऊन तसेच एक जेसीबी विकून पैसे भागविले. काम केले पण बील मिळाले नाही, आपलेच नुकसान झाले यामुळे खचलेल्या जगधने यांनी गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कॅनमधून आणलेले रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.