स्वनिर्मित सौरचुलीचा कोल्हापुरात प्रयोग

By admin | Published: December 25, 2016 01:04 AM2016-12-25T01:04:35+5:302016-12-25T01:04:48+5:30

टाकाऊ वस्तूपासून निर्मिती : घरीच बनवा यंत्र; जिल्ह्यात १२०० यंत्र कार्यान्वित

Self-made solar cooker experiment in Kolhapur | स्वनिर्मित सौरचुलीचा कोल्हापुरात प्रयोग

स्वनिर्मित सौरचुलीचा कोल्हापुरात प्रयोग

Next

तानाजी पोवार -- कोल्हापूरटाकाऊ वस्तूंपासून अगदी स्वस्तात घरच्या घरी तुम्हाला स्वत:ला सौरचूल
(सौर वाळवणी यंत्र) तयार करता आली तर...? हो, हे शक्य आहे. कोल्हापुरातील निसर्गमित्र या संस्थेने त्याचे तंत्र शोधून ते यशस्वी करून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात अशा सुमारे बाराशे सौरचुली कार्यान्वित आहेत. भविष्यात शेतकरी, महिला बचतगट आणि युवकांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आता हा प्रयोग राज्यभर राबविण्यात येणार आहे.
टाकाऊ वस्तू, मोफत मिळणारी सौरऊर्जा आणि प्रकाश याचा वापर करून तयार होणाऱ्या या सौरचुलीबाबत निसर्गमित्र संस्थेने केवळ एक-दोन मोफत कार्यशाळा घेतल्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हे तंत्र पोहोचले.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा नाशवंत शेतीमाल सुकवून तो पुन्हा प्रक्रियेद्वारे उपयोगात आणता येतो. टोमॅटो, कोथिंबीर, पालक, कडीपत्ता, कांदा, फुले आदी नाशवंत माल टाकून देण्यापेक्षा तो सौरचूल यंत्राद्वारे सुकवून पुन्हा उपयोगात आणता येतो. ही किमया पर्यावरणपूरक काम करणाऱ्या कोल्हापूरच्या निसर्गमित्र संस्थेने करून दाखविली आहे.
राज्यात सर्वत्र अनेक कंपन्यांच्या सौरचुली आहेत, पण कमी खर्चात, घरच्या घरी, टाकाऊ वस्तूंपासून सौरचूल यंत्र निर्मिती निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगले आणि पराग केमकर यांनी तयार केली आहे. या फोल्डिंगच्या सौरचुलीचे भौतिकशास्त्रातील आकृतीसारखे भांडे होऊ शकते. दररोज अवघ्या पाचच मिनिटात ते जोडून सौरचूल सुरू करता येते. त्यानंतर तासाभरात रोजच्या स्वयंपाकातील डाळ-भात-भाजी तयार होते. घरावर, छतावर अगर स्लॅबवर अवघ्या तीन फूट जागेत ही सौरचूल कार्यान्वित करता येते.
नैसर्गिक खाद्यपदार्थांच्या रंगासाठी...
बीट, कडीपत्ता, पुदिना, पालक, बेल, बेलफळ, शेंद्री हे सौरचूल यंत्रात वाळवून त्यापासून नैसर्गिक खाद्यनिर्मितीसाठी रंग घरच्या घरी तयार करता येतात. जिल्ह्यातील सुमारे ८०० बचतगटांना हे नैसर्गिक खाद्य रंग निर्मितीचे तंत्र निसर्गमित्र या संस्थेने विनामूल्य देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून दिली आहे.


रोजगार निर्मितीचे तंत्र
कमी खर्चात आणि घरच्या घरी ही स्वनिर्मित सौरचूल असल्याने युवकांसाठी रोजगार निर्मितीचे यातून तंत्र घेता येते. व्यावसायिक स्वरूप न आणता निसर्गमित्र संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून या सौरचुलीसाठी दोनवेळा कार्यशाळा घेऊन अनेकांना सौरचूल बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुमारे १२०० जण या सौरचुलीचा वापर करीत आहेत.
काम जादा
टाकाऊ अ‍ॅल्युमिनियमची फाईल्स (पत्रे) घेऊन केल्यास ही सौरचूल मजबूत व टिकाऊ होते. त्यासाठी कमाल ५००० रुपये खर्च येतो, पण ही सौरचूल अनेक वर्षे काम देते. तसेच फुलांच्या बुकेचा कागद उलटा पत्र्यावर चिकटवूनही हे सौरचूल यंत्र बनवता येते.

सौरचूल निर्मितीचा प्रयोग भविष्यात शेतकरी, महिला बचतगट आणि युवकांना रोजगाराचे नवे साधन होईल. त्यामुळे याच यंत्रात आणखी काही बदल करून आता हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.
- अनिल चौगले,
निसर्ग मित्र, कोल्हापूर


१ या यंत्रातून कार्बनडाय आॅक्साईड वायू निर्माण होत नाही. त्यामुळे हवेचे प्रदूषण होेत नाही.
२ रोजच्या जेवणातील भात, डाळ, भाजी, बीट, रवा, शेंगदाणे, भाजणीचे धान्य दोन तासात तयार करता येते.
३ नैसर्गिक साधन-संपत्तीतील सौरऊर्जेचा वापर होतो.
४ यंत्रातील खाद्यपदार्थ बनविताना नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे व बंदडब्यात असल्यामुळे पदार्थाची वाफ होत नाही. त्यामुळे पदार्थात पौष्टिकता व गुणवत्ता कायम राहते.



शेतकऱ्यांसाठी उपयोगी : शेतीमालाचे भाव कोसळल्यास मातीमोल भावाने माल द्यावा लागतो. अगर शेतीमाल टाकून द्यावा लागतो. अशावेळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते, पण हाच शेतकऱ्यांचा नाशवंत माल या स्वनिर्मित सौरयंत्रामध्ये वाळवून तो पुन्हा वापरात आणता येतो. त्यामुळे संकटकाळी शेतकऱ्याला ही सौरचूल वरदानच ठरते.

Web Title: Self-made solar cooker experiment in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.