कृषी कायदे समजावून सांगण्यासाठी आत्मनिर्भर यात्रा : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:28+5:302020-12-22T04:24:28+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी गुरुवार (दि. २४) पासून आत्मनिर्भर यात्रा काढण्यात येणार ...
कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी गुरुवार (दि. २४) पासून आत्मनिर्भर यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सकाळी अकरा वाजता येडेमच्छिंद्र येथून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याहस्ते यात्रेला सुरूवात होणार आहे. सायंकाळी इचलकरंजी येथे सभा होणार असून यामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी (दि. २५) कोरोची, पेठवडगाव मार्गे पन्हाळा येथे यात्रा जाणार आहे. शनिवारी (दि. २६) शाहूवाडी तालुक्यात विविध गावात ही यात्रा जाणार असून तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. रविवारी (दि. २७) इस्लामपूर येथे यात्रेचा समारोप होणार असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
- राजाराम लोंढे