रेबीज इंजेक्शनबाबत जीवघेणा खेळ, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वयंघोषित कारभार
By भीमगोंड देसाई | Published: December 20, 2023 01:18 PM2023-12-20T13:18:52+5:302023-12-20T13:20:51+5:30
भीमगोंडा देसाई कोल्हापूर : कुत्रे चावल्यानंतर चोवीस तासात ॲन्टी रेबीजची लस न घेतल्यास विष शरीरात भिनण्याचा धोका असतो. इतके ...
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : कुत्रे चावल्यानंतर चोवीस तासात ॲन्टी रेबीजची लस न घेतल्यास विष शरीरात भिनण्याचा धोका असतो. इतके गंभीर असतानाही गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रे चावलेले पाच जण आले तर ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन देणार असा स्वयंघोषित कारभार सुरू आहे. श्वानदंश झालेल्यांच्या जीवाशी खेळले जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात अलीकडे भटक्या कुत्र्याचा हैदोस सुरू आहे. कुत्रे चावल्यानंतर २४ तासांच्या आत ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घेतलेच पाहिजे. ही लस खासगी दवाखान्यात मिळत नाही. यामुळे सीपीआर, तालुका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी श्वानदंश झालेली भळभळणारी जखम घेऊन शक्य तितक्या लवकर पोहोचतात. तिथे अनेकवेळा वैद्यकीय अधिकारी नसतात.
आरोग्य सेविकेला ॲन्टी रेबीजच्या इंजेक्शनची विचारणा केली जाते. त्यावेळी इंजेक्शनसाठी लसचे पॅकिंग फोडले तर ते पाच जणांना द्यावे लागते. यामुळे तुम्ही सोमवारी किंवा शुक्रवारी याच दिवशी पाच जण कुत्रे चावलेले आले असतील तर इंजेक्शन देऊ असे अमानवीपणे सांगितले जाते. नूल प्राथमिक आरोग्य केंद्र असा सल्ला देण्यात आघाडीवर असल्याच्या तक्रारी आहेत.
मनुष्याच्या जीवापेक्षा लसीची जास्त काळजी..
ॲन्टी रेबीज लसीच्या इंजेक्शनसाठी पाच जणच का अशी विचारणा केल्यानंतर एकट्याला देऊन शिल्लक राहिलेली लस खराब होते. यामुळे पाच जण आले तरच इंजेक्शन देऊ असे सांगितले जाते. यावरून संबंधित आरोग्य अधिकारी अणि आरोग्य सेविका, सेवकांना कुत्रे चावलेल्याच्या जीवापेक्षा लसीच्या नासाडीची अधिक काळजी वाटत असल्याचे पुढे आले आहे.
सीरमचे इंजेक्शन नाही...
कुत्र्याची नखे लागली आहेत, दात लागले आहेत पण रक्त आले नसेल तरी ॲन्टी रेबीज लसीचे इंजेक्शन घ्यावेच लागते. रक्त येईपर्यंत चावा घेतला असेल तर ॲन्टी रेबीज सीरमचे इंजेक्शन घ्यावे लागते. हे सीरमचे इंजेक्शन प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही म्हणून सांगितले जाते. कार्यालयीन वेळेशिवाय उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर हे इंजेक्शन देण्यात टाळाटाळ केली जाते.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वानदंश रुग्णांसाठी ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन सर्वांसाठी मोफत दिले जाते. पाच रुग्ण आल्यानंतरच लसीचे इंजेक्शन द्यावे, असा कोणताही आदेश नाही. एक जरी असा रुग्ण आला तरी लसीचे इंजेक्शन देणे बंधनकारक आहे. - डॉ. संजय रणवीर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर