स्वाभिमानीचा ‘शिरोळ’मध्ये विरोधकांना शह
By admin | Published: April 5, 2017 12:46 AM2017-04-05T00:46:18+5:302017-04-05T00:46:18+5:30
जिल्हा परिषदेत सलग दुसऱ्यांदा सत्तेचे पद : पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीतील राजकारणाची परतफेड
संदीप बावचे -- जयसिंगपूर -पद वाटपाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत मित्र पक्षांना संधी देवून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले असतानाच केवळ दोन जि.प. सदस्यांच्या बळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सलग दुसऱ्यांदा सत्तेचे पद मिळविले. शिरोळ पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला घेऊन राजकीय खेळी केली होती. जि.प.चे महिला बालकल्याण सभापतीचे पद घेऊन स्वाभिमानीने दोन्ही काँग्रेस, शिवसेनेसह शिरोळमधील भाजपला शह दिला आहे.
शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात नेत्यांनी सोयीचे राजकारण सुरु केल्याचे चित्र आहे. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेवून सत्ता स्थापन केली होती. या निवडीत आमदार उल्हास पाटील यांनी भाजप व स्वाभिमानीला रोखून एका दगडात दोन पक्षी मारले होते. दोन्ही काँग्रेसने केलेल्या या खेळीचा डाव स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी काढला होता. थेट भाजपला पाुठिंबा देत स्वाभिमानी सत्तेत सहभागी झाली होती. शिरोळ पंचायत सभापती, उपसभापती निवडीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्यामुळे स्वाभिमानीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत ही भूमिका घेतली होती.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महिला बालकल्याण सभापतिपद देण्यात आले. दानोळीच्या जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या निवडीतून स्वाभिमानीला सलग दुसऱ्यांदा सत्तेचे पद मिळाले. सत्तेचे हे पद मिळवून स्वाभिमानीने शिरोळ तालुक्यातील आगामी राजकारणाचा डाव साधला असला तरी सध्या खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजपविरोधी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकारण कसे रंगते, यावरच स्वाभिमानीचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. जिल्हा परिषदेत मिळालेल्या सत्तेच्या पदाचे मार्केटिंग स्वाभिमानी कशी करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
स्वाभिमानीच ‘बाहुबली’
१ जि.प. व पं.स.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय भूकंप घडवून काँगे्रेस व राष्ट्रवादीमधील मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये ओढले होते.
२ शिरोळ तालुक्यात भाजपने केलेल्या या राजकीय खेळीमुळे स्वाभिमानी नाराज होती. त्यामुळेच जि.प., पं.स.निवडणुकीत स्वबळावर स्वाभिमानी लढल्याचे चित्र होते. या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार जिल्हा परिषदेवर शिरोळमधून निवडून आले.
३ जि.प.च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत स्वाभिमानीने भाजपला मदत केली. त्यामुळे विषय समितींच्या निवडीत स्वाभिमानीने सत्तेचे पद मिळवून दोन्ही काँग्रेस, शिवसेना व भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
यांनी भूषविली पदे
जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून शिरोळचे स्व.दिनकरराव यादव यांना संधी मिळाली होती.
त्यांच्यानंतर हसूरचे ए.बी.पाटील यांना जि.प.चे उपाध्यक्षपद मिळाले होते.
नांदणीच्या नंदा पोळ तर उदगावच्या यशोदा कोळी यांनी जि.प.चे अध्यक्षपद भूषविले होते.
दत्तवाडचे बंडा माने यांनीही उपाध्यक्षपद भूषविले असून समाजकल्याण सभापती म्हणून तेरवाडचे विलास कांबळे यांना संधी मिळाली होती.
उदगावचे सावकार मादनाईक, तर टाकळीच्या सीमा पाटील यांनाही जि.प.चे बांधकाम सभापतिपद मिळाले होते.
त्यांच्यानंतर आता दानोळीच्या शुभांगी शिंदे महिला बालकल्याण सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत.
यांनी भूषविली पदे
जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून शिरोळचे स्व.दिनकरराव यादव यांना संधी मिळाली होती.
त्यांच्यानंतर हसूरचे ए.बी.पाटील यांना जि.प.चे उपाध्यक्षपद मिळाले होते.
नांदणीच्या नंदा पोळ तर उदगावच्या यशोदा कोळी यांनी जि.प.चे अध्यक्षपद भूषविले होते.
दत्तवाडचे बंडा माने यांनीही उपाध्यक्षपद भूषविले असून समाजकल्याण सभापती म्हणून तेरवाडचे विलास कांबळे यांना संधी मिळाली होती.
उदगावचे सावकार मादनाईक, तर टाकळीच्या सीमा पाटील यांनाही जि.प.चे बांधकाम सभापतिपद मिळाले होते.
त्यांच्यानंतर आता दानोळीच्या शुभांगी शिंदे महिला बालकल्याण सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत.