घरकुलांसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Published: June 16, 2015 01:29 AM2015-06-16T01:29:25+5:302015-06-16T01:30:00+5:30

इचलकरंजीतील प्रकार : मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर डोके आपटले

Self-Suicidal Attempts for Homework | घरकुलांसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

घरकुलांसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

Next

इचलकरंजी : शहरातील नेहरूनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांचा ताबा मागण्यासाठी तेथील एका लाभार्थ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने नगरपालिकेत जोरदार खळबळ उडाली. तसेच अन्य एका लाभार्थ्याने मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरील काचेवर डोके आपटून आपला संताप व्यक्त केला. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचीही भंबेरी उडाली. तसेच मोर्चाने आलेल्या या आंदोलनकर्त्यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये शंखध्वनी व घोषणाबाजी करून वातावरण दणाणून सोडले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत असलेल्या योजनेतून नेहरूनगर येथे ६३६ घरकुले बांधण्यात येत आहेत. मात्र, त्यापैकी ४८ घरकुलांची इमारत बांधून तयार झाली आहे. गेल्या सुमारे चार वर्षांपासून घरकुलांच्या इमारतीचे बांधकाम वेगवेगळ््या कारणांमुळे रखडले आहे. परिणामी लाभार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तयार घरकुले ताब्यात देण्याची मागणी सातत्याने करूनही पालिका प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाह झालेली नाही. ही घरकुले त्वरित ताब्यात देण्याची मागणी करीत बहुजन सामाजिक संघाच्यावतीने सोमवारी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी पालिकेवर मोर्चा काढला.
बाहेर असलेल्या एका लाभार्थ्याने घोषणा देत अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला तेथे असलेल्या अन्य काहीजणांनी व पोलिसांनी आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केले. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत आंदोलनकर्त्यांनी शंखध्वनी करीत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे धाव घेतली. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येऊन थेट एका लाभार्थ्याने मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर डोके आपटून आपल्या मनातला संताप व्यक्त केला. त्यावेळी तेथे असलेल्या पोलिसांनी त्याला रोखून धरले. हा प्रकार सुरू असताना आंदोलनकर्ते लाभार्थी व पोलीस यांच्यात झटापट उडाल्याने वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला होता. हा गोंधळ काही वेळाने शांत झाला.
त्यानंतर नगरसेवक अब्राहम आवळे यांनी नेहरूनगरमधील लाभार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. तेव्हा मुख्याधिकारी सुनील पवार यांनी पालिकेच्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. नजीकच्या दोन-चार दिवसांत त्याठिकाणी राहिलेल्या घरकुलांना भुयारी गटारीची जोडणीसह अन्य अंतिम टप्प्यातील कामे मार्गी लावू, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रतीक्षा यादीवरील ४८ लाभार्थ्यांची नावे द्या, त्यांना तत्काळ घरकुले देण्यात येतील,असेही स्पष्ट केले. तेव्हा राहिलेल्या लाभार्थ्यांचे काय, असा प्रश्न नगरसेवक आवळे यांनी उपस्थित केला. तसेच तीन इमारती बांधण्याची रिकामी जागा असतानासुद्धा तेथे बांधकाम केले जात नाही, याचा जाब विचारला.
त्यावर मुख्याधिकारी पवार यांनी केंद्र सरकारने घरकुलांसाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, जुन्या दराने काम करण्यास मक्तेदार तयार नाही. म्हणून घरकुलांचे काम रखडले आहे. नवीन वाढीव दराला शासनाने मंजुरी दिल्यानंतर अन्य इमारतींचेसुद्धा बांधकाम सुरू होईल, असे सांगितले. त्यानंतर शांत झालेले लाभार्थी तेथून परत गेले. (प्रतिनिधी)


प्रकल्प सल्लागारावर संताप व्यक्त
आंदोलनकर्ते लाभार्थी परत जात असताना घरकुल योजनेचे प्रकल्प सल्लागार प्रशांत हावळ यांना पाहताच संताप व्यक्त केला. काहींनी हावळ यांना धक्काबुक्की करून लाथ मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Self-Suicidal Attempts for Homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.