शेतकरी भेटेल तशा दराने खत विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:59+5:302021-05-26T04:24:59+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, कोल्हापूर ...
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही पोटॅश, सल्फेटची नवीन दरानेच विक्री सुरू आहे. विशेषकरून शेतकरी भेटतील, त्याप्रमाणे विक्रेते त्यांच्याकडून पैसे घेत असून, मिश्रखतांची मात्र विक्री जुन्या दराने होत आहे. खत टंचाईच्या आडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
रासायनिक खतांच्या कंपन्यांनी खतांच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. युरिया वगळता इतर खतांच्या दरात तब्बल ५० टक्के वाढ केली होती. पन्नास किलोच्या पोत्यामागे ४०० पासून ८०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले हाेते. खतासाठी लागणारा कच्चा माल व इंधनाच्या दरात वाढ आणि देशातील कोरोनाचे संकट या सगळ्यामुळे खतांच्या किमतीत वाढ केल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र या दरवाढीला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे केंद्र सरकारने खतांच्या किमती पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकऱ्यांना खते देण्याचे आदेशही कंपन्यांना देण्यात आले. काही ठिकाणी मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शेतकरी भेटेल तशी जुन्या, नव्या दराने खतांची विक्री होत आहे. विशेषत: ‘मिरगी’ डोस म्हणून उसासाठी पोटॅश व अमोनियम सल्फेट लागते. काही ठिकाणी या दोन खतांची नवीन दराने विक्री होत असल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांना पैसे परत द्यावे लागणार
केंद्राचा खत दरवाढ मागे घेण्याचा निर्णय होण्याअगोदर नवीन दराने खतांची विक्री केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना वाढीव व जुन्या दरातील फरकाचे पैसे परत देण्याचे आदेश खत कंपन्यांनी दिले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी पैसे परत देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे दिसले.
असे आहेत खतांचे दर...
युरिया - २६६
सुफर फॉस्फेट - ४४०
पोटॅश - ८५०
डीएपी - १३००
१० : २६ : २६ - १०७५
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील खरीप -
लागवड क्षेत्र - ३,९३,००० हेक्टर
खरीप गावे - १२९३
वार्षिक पर्जन्यमान - १९६४ मिलिमीटर
अत्यल्पभूधारक शेतकरी- ५,०४,११७ (क्षेत्र - १,६८,११४ हेक्टर)
अल्पभूधारक शेतकरी - १,०५,४९२ (क्षेत्र - १,२८,९०४ हेक्टर)
कोट-
पोटॅश व सल्फेट ही खते वाढीव दराने दिली जात आहेत. इतर खते जुन्या दराने मिळत आहेत. वास्तविक केंद्र सरकारने खतांच्या वाढीव किमती मागे घेतल्या असताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. कृषी विभागाने याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे.
- पोपट पाटील (शेतकरी, शिरढोण )
खतांची दरवाढ मागे घेतल्यापासून पहिल्या दराप्रमाणेच खते मिळत आहेत. जिथे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा आहे, त्यात शेतकरी जागरुक असल्याने जादा दर घेण्याचे धाडस कोण करत नाही.
- तानाजी खाडे (शेतकरी, कासारपुतळे)