ज्ञान पैशांसाठी विकणे हा मूर्खपणा, डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 01:29 PM2023-06-27T13:29:12+5:302023-06-27T13:30:38+5:30
कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार शानदार समारंभात शाहू छत्रपती यांच्या हस्ते डॉ. अभय बंग यांना प्रदान
कोल्हापूर : आपण मिळविलेले ज्ञान पैशासाठी विकणे याच्यासारखा दुसरा मूर्खपणा असू शकत नाही. आयुष्य एकदाच मिळणार असेल तर हा मूर्खपणाचा सौदा कशासाठी करायचा? ज्ञान विकू नका ते दूसऱ्यांना द्या, असे आवाहन ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे प्रणेते डॉ. अभय बंग यांनी केले.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार शानदार समारंभात शाहू छत्रपती यांच्या हस्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला; परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्याच्या कारणावरून डॉ. राणी बंग येऊ शकल्या नाहीत. दोघांच्यावतीने डॉ. बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अध्यक्षस्थानी राज्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर होते. यावेळी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. एक लाख रुपये, फेटा, शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. बंग यांनी वरील आवाहन केले.
बंग म्हणाले, विज्ञानावर विश्वास नसलेल्या आदिवासी समाजात काम करताना विज्ञान आणि तेथील सामाजिक समस्या एकत्र आणून आदिवासींमधील अर्धशिक्षित महिलांकडे विज्ञानाचे सत्तांतर केेल्यामुळेच चमत्कार घडला. खेड्यातील आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या कामास महात्मा गांधी याचे विचार, संस्कार उपयोग आले असेही ते म्हणाले. केंद्र सरकार आता सर्वांचे सिकलसेल आजाराचे सर्वेक्षण करू पाहत आहे, तसे केल्याने सुमारे वीस टक्के लोकसंख्येवर नव्याने वांशिक हीनतेचा ठपका लागण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, आपल्या देशात अगोदरच जात व वर्णव्यवस्था समाजात मुरली आहे. खरेतर सिकलसेल हा मलेरियाचे संरक्षक कवच असणारा आजार आहे. त्याचे प्रमाण वीस टक्क्यापर्यंत असून तो मध्य भारतात प्रामुख्याने आढळतो. केंद्र सरकारने त्याचे सर्वेक्षण करून त्याचे कार्ड दिल्यास त्यांच्या कपाळावर वांशिक हीनतेचा शिक्का मारला जाईल. आई-वडिलांना सिकलसेल असेल तर त्यातून जन्माला येणाऱ्या अपत्यास गंभीर आजार होऊ शकतो. ते टाळण्यासाठी हा आजार असलेल्यांनी लग्न करू नये म्हणून चांगल्या उद्देशाने हे सर्वेक्षण होत असले तरी तो हेतू बाजूला पडेल म्हणून मी सावध करत आहे.
परदेशात शिकून आल्यानंतर आदिवासी क्षेत्रात आरोग्यसेवेचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गडचिरोली गाठली. दारूचे व्यसन, बालमृत्यू, पाठदुखीच्या समस्या यासारख्या अनेक समस्या आदिवासींना भेडसावत होत्या; परंतु त्यांचा विज्ञानावर अजिबात विश्वास नव्हता. म्हणून मी आणि डॉ. राणी बंग यांनी आदिवासींच्या श्रद्धेला कुठेही धक्का न लावता विधान विज्ञानवादी विधायक वळण लावण्याचा प्रयत्न केला. गावातीलच अर्धशिक्षित महिलांना वैद्यकीय शिक्षण सोपे करून सांगून त्यांच्या हाती विज्ञान सत्तांतरित केले. रुग्णालयांसारख्या इमारती न बांधता त्यांच्या झोपड्यांसारखेच देवींच्या नावे दवाखाने सुरू केले, असे डॉ. बंग यांनी सांगितले.
कोल्हापूरने मोहर उमटविली
शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेंव्हा मला फोन आला तेंव्हापासून या पुरस्कारामागे नाव लावून घेण्याची माझी योग्यता आहे का? याचा विचार करत होतो. या पुरस्काराला एक प्रतिष्ठा आहे. इतिहास आहे. गांधी विचाराने केलेल्या कामामुळे मला अनेक पुरस्कार मिळाले, पण आज मिळालेल्या शाहू पुरस्काराने मी पुरस्कार घेण्यास पात्र असल्याची मोहर उमटविली, अशा भावना डॉ. बंग यांनी व्यक्त करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
अमराठी असूनही भरभरून प्रेम
या समारंभात मी आज एक गोष्ट उघड करतो, असे सांगून डॉ. बंग म्हणाले, आम्ही बंग कुटुंब अमराठी आहोत. परंतु महाराष्ट्राने आम्हांला मनोमन स्वीकारले. राज ठाकरे यांनी मुंबईत आमचे फोटो वापरून मोठे फलक लावले आणि त्यावर हे खरे महाराष्ट्रीयन असे लिहिले..
शाहूंच्या कार्याबाबत अजूनही आंधळेच
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबाबत अजूनही आपली अवस्था हत्ती व चार आंधळे या गोष्टीसारखी आहे. त्यांचा जो पैलू सापडला त्यावरून त्यांच्या कार्याचे वर्णन झाले. परंतु असे अनेक पैलू आहेत की ते समोर यायचे आहेत. ते पुढील काळात येतील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तरच भारताचे दारिद्र्य कमी होईल
परदेशात शिकायला अनेकजण जातात. सरकारच्या खर्चाने जातात. पण शिक्षण घेतल्यानंतर तेथेच राहतात. तेथेच सेवा देतात. त्यांनी भारतात येऊन जेथे गरज आहे तेथे सेवा दिली तर भारतातील दारिद्र्य, मागासलेपण कमी होईल, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.
शाहू मिलच्या अडचणी दूर होतील
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुढील वर्षी १५०वी जयंती आहे. त्यामुळे शाहू मिल येथील स्मारक करण्याबाबतचा आमचा विचार आहे. शाहू मिलबाबतच्या अडचणीही येत्या महिन्याभरात दूर होतील. हे स्मारक कसे असावे याचा आराखडा येथील जनतेने ठरविला पाहिजे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
खासदार-आमदारांची दांडी..
शाहू महाराजांना विचाराने अभिवादन करण्याच्या या सोहळ्यास कोल्हापूरचे तिन्ही खासदार व बाराही आमदार अनुपस्थित होते. उठता-बसता शाहूंचा जप करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने उपस्थितांतून नाराजी व्यक्त झाली.
प्रारंभी शाहू गौरवगीताने समारंभाची सुरुवात झाली. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन ट्रस्टच्या सचिव मोहिनी चव्हाण यांनी केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ.अशोक चौसाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. ट्रस्टचे व्यवस्थापक राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.