Kolhapur Crime: बोगस कागदपत्रे, फेक फोटो लावून ‘सिम’ची भाजीपाल्यासारखी विक्री; एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 11:56 AM2023-09-02T11:56:24+5:302023-09-02T13:08:17+5:30

पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब राज्यांत विक्री

Selling SIM cards based on fake documents, One arrested in Ichalkaranji of Kolhapur | Kolhapur Crime: बोगस कागदपत्रे, फेक फोटो लावून ‘सिम’ची भाजीपाल्यासारखी विक्री; एकाला अटक 

Kolhapur Crime: बोगस कागदपत्रे, फेक फोटो लावून ‘सिम’ची भाजीपाल्यासारखी विक्री; एकाला अटक 

googlenewsNext

इचलकरंजी : बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे सिम कार्ड वितरीत करणाऱ्या एकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. राहुल बाबूराव माने (वय २७, रा. खोतनगर तारदाळ, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने ही माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकातील पोलिस हवालदार आनंदराव सोपान पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

भाग्यरेखा चित्रमंदिराजवळ राहुल याची आर.एम. कम्युनिकेशन नामक एजन्सी आहे. या दुकानातून बनावट कागदपत्रे तयार करून मोबाइलचे सिम कार्ड विक्री केली जात असल्याची माहिती भारत सरकारच्या दूरसंचार विभागाला कागदपत्रांच्या पडताळणीत आढळली. त्यामुळे त्यांनी ही माहिती कोल्हापूर पोलिसांना दिली. 

त्यानुसार कोल्हापूरच्या दहशतवादीविरोधी पथकाने तपास केला. त्यामध्ये या दुकानातून सिम कार्डचे डीलर, सबडीलरकडून घेतलेल्या मोबाइल कंपनीचे सिम कार्डस बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री झाले आहेत. कागदपत्रे तपासली असता त्यामध्ये सिम कार्ड खरेदी करणाऱ्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषेतील व्यक्तीचे फोटो आणि त्यास ओळखपत्र म्हणून अनेक विपरीत व्यक्तींच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडून ते कार्ड ॲक्टिव्हेट करून विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी माने याला अटक केली असून त्याच्याकडून १४६ सिम कार्ड हस्तगत केली आहेत. त्याने अशा कार्डचे वितरण पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, आदी प्रांतात केल्याची माहिती समोर आली आहे.

सिम कार्ड खरेदीसाठी दिलेल्या आधार कार्डावर संबंधित व्यक्तीऐवजी अन्य व्यक्तींचे विविध वेशभूषेतील फोटो लावून या बनावट कागदपत्रांद्वारे सिम कार्ड वितरीत करून ती ॲक्टिव्हेट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सिम कार्डचा वापर देश विघातक कृत्यांसाठी होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी सांगितले.

पंजाब येथे एजंट

बनावट कागदपत्रांच्या आधारे ॲक्टिव्हेट केलेले सिम कार्ड वितरण करण्यासाठी पंजाब येथे माने याने एजंट नेमले असल्याचे आणि त्याच्या माध्यमातून पंजाब येथे त्याने १२६ सिम कार्ड वितरीत केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे. माने याचा पंजाब येथील त्या व्यक्तीशी ओळख सोशल मीडियावरून झाली होती. त्यामुळे त्याने त्याला सबडीलर म्हणून नियुक्त केले आहे. त्याचा तपास करण्यासाठी येथील पोलिसांचे एक पथक पंजाबला जाणार आहे.
 

Web Title: Selling SIM cards based on fake documents, One arrested in Ichalkaranji of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.