बहिष्काराचा अहवाल तातडीने पाठवा

By admin | Published: June 10, 2015 11:43 PM2015-06-10T23:43:35+5:302015-06-11T00:20:58+5:30

तहसीलदारांचे आदेश : कसबा सांगाव येथील प्रकरणाचा तपास दोन दिवसांत करणार

Send exclusion report promptly | बहिष्काराचा अहवाल तातडीने पाठवा

बहिष्काराचा अहवाल तातडीने पाठवा

Next

कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथील धनगर समाजअंतर्गत सात कुटुंबीयांवर टाकण्यात आलेल्या सामाजिक बहिष्काराची चौकशी करून तसा अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश तहसीलदार शांताराम सांगडे यांनी कागलचे पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांना दिले आहेत. दरम्यान, मंडल अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताने गावात खळबळ उडाली. विविध संघटनांनी या प्रकरणी विचारपूस केली आणि माहिती घेतली. मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी असा काही प्रकार होत असेल तर तो चुकीचा आहे; मात्र दोन्ही बाजंूच्या लोकांना एकत्र घेऊन लवकरच वाद मिटविला जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
कसबा सांगावमधील सात कुटुंबांनी आपल्यावर समाजाअंतर्गत बहिष्कार टाकल्याची तक्रार तहसीलदारांकडे तसेच माध्यमांकडे केली होती. तहसीलदारांनीही याची दखल घेतली नाही, असा आरोप केला होता. याबाबत तहसीलदार शांताराम सांगडे म्हणाले की, हे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी तत्काळ कारवाई करा अशी मागणी केली. मात्र, मला आधी माहिती घेऊ द्या, नंतर योग्य ती कारवाई करतो, असे सांगितले आहे. सामाजिक बहिष्कारासारखा प्रकार चुकीचा असून, पोलिसांच्या वतीने तसेच मंडळ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत चौकशी करून निश्चितपणे कारवाई केली जाईल. तसेच प्रशासन पातळीवर हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल. बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बहिष्कार टाकण्यात आलेल्या कुटुंबीयांची बैठक होऊन, आम्ही या बहिष्काराचे पुरावे कधीही सादर करू शकतो, असे स्पष्ट केले. तर ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनीही समाजाच्या व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले. मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. ते म्हणाले की, मी दोन्ही बाजूंच्या लोकांशी संपर्क साधला आहे. दोन्ही बाजूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी लवकरच बैठक घेऊन हा वाद मिटविला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Send exclusion report promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.