कुलपतींना रोज पत्रे पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:44 AM2018-04-13T00:44:43+5:302018-04-13T00:44:43+5:30
कोल्हापूर : राज्यातील सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीवरील बंदी उठविण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी. पदवीधारक आणि पात्रताधारकांकडून आता थेट कुलपतींना विनंती केली जात आहे. पात्रताधारकांनी पुकारलेल्या आंदोलनातील एक टप्पा म्हणून ही पत्रे (पोस्टकार्ड) पाठविली आहेत.
राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या रिक्तपदांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. सीएचबीधारक हे भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळेल, या आशेवर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याचे शासनाचे वेळकाढू धोरण आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात राज्यातील संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र सेट-नेट, पीएच.डी. पात्रताधारक संघटनेतर्फे आता सहायक प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्यासाठी कुलपतींना पत्रे पाठविण्याची विनंती करणार आहेत. राज्यातून साडेतीन हजार पत्रे पाठविण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
कोल्हापुरातून रोज ४० पत्रे पाठविणार
पात्रताधारक आणि सीएचबीधारकांची सद्य:स्थिती पाहता सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीवरील बंदी उठविणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, त्यादृष्टीने शासन आणि सरकारकडून काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आम्ही राज्यभरात आंदोलन पुकारले आहे, असे महाराष्ट्र सेट-नेट, पीएच.डी., पात्रताधारक संघटनेचे कोल्हापूर समन्वयक डॉ. किशोर खिलारे यांनी सांगितले. ते म्हणाले, याअंतर्गत कुलपतींना पत्रे पाठवून भरती बंदी उठवावी. सहायक प्राध्यापकपदाची भरती सुरू करून आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली आहे. कोल्हापुरातून रोज ४० पत्रे पाठविण्यात येणार आहेत.