प्रस्ताव पाठवा, कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी देऊ; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 4, 2023 06:49 PM2023-11-04T18:49:48+5:302023-11-04T18:50:07+5:30

अंबाबाई, जोतिबा, किल्ल्यांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण

Send proposal, provide substantial funds for tourism development of Kolhapur; Testimony of Union Tourism Minister | प्रस्ताव पाठवा, कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी देऊ; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही 

प्रस्ताव पाठवा, कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी देऊ; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही 

कोल्हापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करून कोल्हापूरचापर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी दिली.

पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या अंबाबाई, जोतिबा मंदिरासह महत्त्वाचे किल्ले व पर्यटनस्थळांसाठी ९०० कोटींचा आराखडा पुरातत्त्व विभागाने तयार केला आहे. तसेच पर्यटन विकासासाठी पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, महापालिका यांनी केलेल्या आराखड्यांचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. 

बैठकीला पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहने, वास्तुविशारद कासार पाटील (नाशिक), अंजली कलमदानी(पुणे), आभा लांबा (मुंबई), पूनम ठाकूर (मुंबई), तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली.

मंत्री नाईक म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी पोषक वातावरण आहे. अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पर्यटनस्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा. त्याच्या मंजुरीसाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मंत्री श्रीपाद नाईक हे गोवा येथील असल्यामुळे त्यांचे कोल्हापूरशी घट्ट नाते आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ते निश्चित निधी देतील. निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. या निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील. जोतिबा डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित रोप वेचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करा. किल्ल्यांचा विकास आराखडा करताना आजूबाजूच्या परिसराचाही विकास होईल, याकडे लक्ष द्या. पन्हाळा ते विशाळगडदरम्यान ट्रेकिंग मार्गावर सोयीसुविधा व दिशादर्शक फलक लावा.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देऊन राज्य शासनाला पाठविण्यात येत असलेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्तीसाठी १३.५२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

यांचा होणार विकास..

अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत. यासह जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण त्या-त्या विभागप्रमुखांनी केले.

Web Title: Send proposal, provide substantial funds for tourism development of Kolhapur; Testimony of Union Tourism Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.