प्रतिनियुक्त पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवा, अपर पोलिस महासंचालकांचा आदेश
By उद्धव गोडसे | Published: July 31, 2024 02:17 PM2024-07-31T14:17:30+5:302024-07-31T14:17:48+5:30
अनेकांची अडचण होणार
कोल्हापूर : पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांकडून काही पोलिसांना प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी संलग्न केले जाते. मात्र, सोयीने संलग्नता देण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय तरतूद नाही. त्यामुळे बदली झालेल्या पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवावे, असा आदेश अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढला आहे. या आदेशामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, अनेकांना सोयीच्या ठिकाणांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
पोलिस ठाण्यात किंवा परिक्षेत्रातील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांच्या बदल्या होतात. दरवर्षी ही प्रक्रिया सुरू असते. मात्र, बदल्या झाल्यानंतर मर्जीतील काही कर्मचारी आणि अधिका-यांची प्रतिनियुक्तीद्वारे सोय लावली जाते. संबंधित पोलिसांना संलग्न करून घेतले जाते. मात्र, प्रतिनियुक्तीवर संलग्न करून घेण्याची तरतूद कायदेशीर आणि प्रशासकीय नाही.
राज्यात अनेक ठिकाणी शेकडो पोलिस प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचा प्रकार निदर्शनास येताच संबंधित पोलिसांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी पाठवण्याच्या सूचना पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिल्या. त्यानुसार कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी मंगळवारी (दि. ३०) एक परिपत्रक जारी केले. त्याद्वारे प्रतिनियुक्तीवर संलग्न असलेले सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश तातडीने सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांना पाठवण्यात आला.
पोलिस दलात खळबळ
प्रतिनियुक्ती हा नेहमीच पोलिस दलात कळीचा मुद्दा असतो. मर्जीतील कर्मचा-यांनाच प्रतिनियुक्ती मिळते. अधिका-यांच्या बाबतीतही असेच घडते. मात्र, नव्या आदेशामुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागणार असल्याने अनेकांचे मनसुबे उधळले जाणार आहेत. तर प्रतिनियुक्ती न मिळालेल्या कर्मचा-यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे चित्र पोलिस दलात दिसत आहे.