दोन दिवसांत १ कोटींचा चेक पाठवून देतो; कोल्हापुरातील नाट्यगृहासाठी शरद पवारांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:47 PM2024-09-03T14:47:01+5:302024-09-03T14:49:11+5:30
नाट्यगृहासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
Sharad Pawar Kolhapur ( Marathi News ) : आगीमुळे जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. "राज्यसभा खासदार म्हणून आम्हाला पाच कोटी रुपयांचा निधी असतो. मी आताच माझ्या सचिवाकडे आपला किती निधी शिल्लक आहे, याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलं की आपल्याकडे १ कोटी रुपये शि ल्लक आहेत. मी त्यांना सांगितलं की दोन दिवसांत इथं १ कोटी रुपयांचा चेक पाठवून द्या," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
नाट्यगृह उभा करण्यासाठीच्या निधीबाबत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, "कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपआपल्या निधीतील २० टक्के रक्कम दिली तर हे नाट्यगृह उभं करण्यास मदत होईल. खासदार शाहू छत्रपती आणि बंटी पाटील यांनी आपल्या निधीतून रक्कम दिली आहे. आता उर्वरित लोकप्रतिनिधींच्या नावाची यादी तुम्ही तयार करा, तुमच्याकडून नाही झालं तर हे काम माझ्यावर सोपवा. मी त्या सर्व लोकप्रतिनिधींना काय सांगायचं ते सांगतो आणि या सगळ्यातून आपण ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करू," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली आहे २० कोटींची घोषणा
करवीरनगरीचे भूषण असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आग एवढी प्रचंड होती की यामध्ये निम्मे नाट्यगृह जळून खाक झाले. आगीच्या या आक्राळविक्राळ रूपाने अनेकांच्या पोटात खड्डाच पडला. शर्थीच्या प्रयत्नांनी सुदैवाने दर्शनीभाग शाबूत राहिला असला तरी नाट्यगृहाचे संपूर्ण छप्पर आणि आतील संपूर्ण खुर्च्यांसह विद्युत आणि अन्य यंत्रणा निकामी झाली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करत नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सरकारकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली होती.
"राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर भक्कमपणे उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले ऐतिहासिक नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची अर्थिक मदत देण्यात येईल," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती.