भाजप नेते अमित शहा उद्या कोल्हापुरात, विधानसभेचे फुंकणार रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 11:58 IST2024-09-24T11:57:48+5:302024-09-24T11:58:55+5:30
पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

भाजप नेते अमित शहा उद्या कोल्हापुरात, विधानसभेचे फुंकणार रणशिंग
कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बुधवारी संध्याकाळी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार असून, एकप्रकारे शहा हे विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच या ठिकाणी फुंकतील असे मानले जाते.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शहा यांचे नाशिकहून कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर ते महासैनिक दरबार हॉल येथे होणाऱ्या दोन तासांच्या या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. रात्री साडेआठ वाजता ते कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभेला महायुतीला महाराष्ट्रात जबरदस्त झटका बसल्यानंतर भाजप नेते कमालीचे सावध झाले असून, याचाच एक भाग म्हणून निवडणूक होण्याच्या दीड महिना आधी शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना ‘कानमंत्र’ देणार आहेत.
फडणवीस, बावनकुळेंसह अनेक नेते राहणार उपस्थित
या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, खासदार धनंजय महाडिक, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह या पाचही जिल्ह्यांतील प्रमुख नेते, आमदार, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.