गॅस अनुदानासाठी ज्येष्ठ नागरिकाचे हेलपाटे, ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:46 AM2019-03-06T10:46:18+5:302019-03-06T10:47:49+5:30
गॅसचे अनुदान एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जमा होत असल्याने गंगावेश परिसरातील गुरुवार पेठमधील ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दीड वर्ष हेलपाटे मारावे लागावे लागत आहेत. याबाबत शामराव गोपाळ जाधव (वय ७६, सध्या रा. ४६, डी वॉर्ड, कोल्हापूर) यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार केली.
कोल्हापूर : गॅसचे अनुदान एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जमा होत असल्याने गंगावेश परिसरातील गुरुवार पेठमधील ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दीड वर्ष हेलपाटे मारावे लागावे लागत आहेत. याबाबत शामराव गोपाळ जाधव (वय ७६, सध्या रा. ४६, डी वॉर्ड, कोल्हापूर) यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार केली.
जाधव यांनी सांगितले की, माझे ताराबाई रोडवरील एका सहकारी बँकेत खाते आहे. या खात्यावर गॅसचे अनुदान जमा होत होते; पण १६ आॅगस्ट २०१७ पासून गॅसचे अनुदान दुसऱ्या बँकेत जमा होत आहे. येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे येथून निवृत्त झालो आहे. मुलगा पुणे येथे नोकरीस असल्याने कसबा गेट येथील जिरगे बोळ येथे सध्या भाड्याच्या घरात मी व पत्नी असे दोघेच राहतो.
शहरातील एका बँकेत गॅसचे अनुदान जमा होते. ते मला मिळते. परंतु, ये-जा करण्यासाठी एक तर चालत जावे लागते किंवा रिक्षाने जावे लागते. दीडशे रुपयांच्या अनुदानापोटी रिक्षाला ५० रुपये भाडे घालावे लागते. घरापासून सहकारी बँक जवळ असल्याने गॅसचे अनुदान या सहकारी बँकेत पूर्ववत मिळावे, अशी मागणी आहे.
याबाबत संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या ठिकाणी आधार कार्ड लिंक होते, त्याच ठिकाणी संबंधितांचे पैसे जमा होतात, अशी व्यवस्था आहे. ज्या व्यक्तीच्या नावे (ग्राहक) नंबर आहे, त्यालाच ते पैसे मिळतात. त्यामुळे जाधव यांना गॅस अनुदान न मिळण्यात गॅस एजन्सीचा दोष नाही.
याचबरोबर संबंधित बँकेशी संपर्क साधला असता, जाधव यांनी दोन्ही ठिकाणी गॅस अनुदानाचे पर्याय दिल्याने त्यांचे पैसे बँकेत जमा होतात. त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आमच्याकडे आणून दिल्यास त्यांचे गॅस अनुदान पूर्ववत त्यांच्या पहिल्या बँकेत जमा होईल, असे बँकेने सांगितले.