ज्येष्ठ नागरिकास पोलिसांतील माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:27+5:302021-04-24T04:24:27+5:30
कोल्हापूर : भरदुपारी उन्हाच्या तडाख्यात बंद पडलेली दुचाकी ढकलत निघालेल्या ज्येष्ठ नागरिकास पोलिसांतील माणुसकीचे शुक्रवारी दुपारी दर्शन घडले. कोरोनाच्या ...
कोल्हापूर : भरदुपारी उन्हाच्या तडाख्यात बंद पडलेली दुचाकी ढकलत निघालेल्या ज्येष्ठ नागरिकास पोलिसांतील माणुसकीचे शुक्रवारी दुपारी दर्शन घडले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरासह उपनगरातही संचारबंदीमुळे रस्ते सुनसान होऊ लागले आहेत. अशा वेळी एखाद्याची दुचाकी पेट्रोल संपल्याने बंद पडली तर त्याला ती तेथेच सोडून चालत जावे लागते. नाही तर ती दुचाकी ढकलत पेट्रोल पंपावर न्यावी लागते. अशीच घटना शुक्रवारी दुपारी नवीन वाशीनाका परिसरात घडली. हणमंत अनंतराव लांडगे (वय ७६, रा. जीवबानाना पार्क) हे दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे भरदुपारी ढकलत निघाले होते. त्यादरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग व्हॅन जात होती. त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, सुनील आमते, शिवाजी पाटील होते. त्या आजोबांची परिस्थिती पाहून सहायक पोलीस निरीक्षक नांद्रेकर यांनी मोबाइल दुचाकी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश गोसावी व शाहू तळेकर यांना बोलावून घेतले. त्यांना स्वत:कडील शंभर रुपये देऊन पेट्रोल आणण्यास सांगितले. गोसावी व तळेकर यांनी पुईखडीजवळील पेट्रोलपंपावर जाऊन पेट्राले आणले. ते पेट्रोल दुचाकीत घालून ती सुरूही करून दिली. पोलीस मदतीला धावून आल्यामुळे आजोबा सुखावले.
फोटो : २३०४२०२१-कोल-नवीन वाशी नाका
ओळी : कोल्हापुरातील नवीन वाशी नाका परिसरात शुक्रवारी भरदुपारी दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ढकलत निघालेल्या आजोबांना पोलिसांनी मदतीचा हात दिला. या आजोबांसोबत पोलीस कर्मचारी योगेश गोसावी व शाहू तळेकर.