ज्येष्ठ नेते गुंडोपंत सूर्यवंशी यांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:54 PM2020-05-20T14:54:12+5:302020-05-20T16:23:59+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे बंधाऱ्यावरुन चारचाकी गाडी कोसळून बुधवारी झालेल्या अपघातात शेकापचे ज्येष्ठ नेते गुंडोपंत उर्फ गुंडाण्णा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. ते ७३ वर्र्षांचे होते.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोगे बंधाऱ्यावरुन चारचाकी गाडी कोसळून बुधवारी झालेल्या अपघातात शेकापचे ज्येष्ठ नेते गुंडोपंत उर्फ गुंडाण्णा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. ते ७३ वर्र्षांचे होते.
कसबा बीड येथील गुंडोपंत सूर्यवंशी हे सकाळी कुडित्रे येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून आपल्या अल्टो या चारचाकीतून ते गावी परतत असताना कोगे-कुडित्रे मार्गावरील अरुंद असलेल्या कोगे बंधाऱ्यावरुन १२. ४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी भोगावती नदीत कोसळली. हा अपघात झाल्याचे समजताच बंधाºयावर प्रचंड गर्दी झाली होती.
स्थानिक लोकांच्या प्रयत्नांमुळे सुमारे सव्वा एकच्या सुमारास त्यांची गाडी बाहेर काढण्यात आली. गाडीत गुंडाण्णा जखमी अवस्थेत होते. त्यांना तत्काळ कोल्हापूरात सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली आहे.
गुंडोपंत सूर्यवंशी हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. उभी हयात त्यांनी पक्षाचे काम केले. शेकापचे नेते माजी आमदार संपतबापू पवार यांच्याबरोबरीने त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मुलांनी अलिकडेच काँग्रेसचे काम सुरु केले आहे.
करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी आणि जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष श्यामराव सूर्यवंशी यांचे ते वडील होत.