ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील यांचे निधन, 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By संतोष.मिठारी | Published: December 7, 2022 09:03 PM2022-12-07T21:03:17+5:302022-12-07T21:11:43+5:30
अार्थिक विकास या विषयावरील लेखनाबाबत लोकमतने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले होते.
कोल्हापूर - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. तथा जयकुमार फाजगोंडा पाटील (वय ८२) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठात दीर्घकाळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याशिवाय विद्यापीठ व सामाजिक संस्था, सरकारच्या विविध मंडळांवर सदस्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, मुलगा अभिनंदन, मुलगी राजलक्ष्मी असा परिवार आहे.
पांढऱ्या पेशी कमी होवून अशक्तपणा आल्याने डॉ. पाटील यांना शनिवारी राजारामपुरीतील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे नांद्रे (जि. सांगली) येथील असणारे डॉ. पाटील यांची कर्मभूमी कोल्हापूर होती. ते महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य होते.
मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांची इंग्रजी व मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्र, मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधन झाल्याचे समजताच रूग्णालयात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, आदींनी गर्दी केली.