रक्षाबंधनाला नटून-थटून ऑफिसला आल्या, राखी बांधायच्या दिवशीच हातात बेड्या पडल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 04:06 PM2022-08-11T16:06:15+5:302022-08-11T16:44:36+5:30
ऐन रक्षाबंधन सणादिवशीच भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी या लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या हातात बेडया पडल्या
कोल्हापूर : रक्षाबंधन सणादिवशी भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या हातात बेडया पडल्या. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी मंजुरीसाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी संशयित भावना सुरेश चौधरी (वय ५६, रा. औंध पुणे, सध्या रा. नर्सिंग ट्रेनिंग सेंटर, लाईनबझार कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. या विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी ही माहिती दिली.
रक्षाबंधन असल्याने अन् स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी त्या कार्यालयास नटूनथटून आल्या होत्या. त्यानंतर लगेचच त्यांना लाच घेताना पकडले. कारवाईनंतर त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कसबा बावडा रोडवरील शासकीय मध्यवर्ती इमारतीत आरोग्य सेवा उपसंचालकांचे कार्यालय आहे. या कार्यालयात आरोग्य विभागातील निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधीतील ९० टक्के रक्कम मिळवण्यासाठी उपसंचालकांकडे अर्ज केला. सहा लाख ७२ हजार रुपये मंजूर करण्यासाठी भावना चौधरी यांनी ६ हजार ७०० रुपये मागितले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. लाचेच्या रकमेतील पाच हजार रुपये तडजोडीअंती देण्याचे ठरले.
याची खातरजमा विभागाकडून शासकीय पंचांच्या समक्ष करण्यात आली. प्रतिबंधक विभागाच्या गुरुवारी दुपारी कार्यालय परिसरात याबाबत लाचलुचपत पथकाने सापळा रचला. त्यानुसार पाच हजारांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई झाल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये मोठमोठ्याने झाल्याचे वाद प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
चौधरी यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, अंमलदार शरद पोरे, मयूर देसाई, रूपेश माने, संदीप पडवळ, पोलीस कर्मचारी छाया पाटोळे यांनी केली.