ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय शिंदे यांचे निधन
By Admin | Published: September 12, 2015 12:42 AM2015-09-12T00:42:03+5:302015-09-12T00:50:23+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी यांच्याबरोबर दत्तात्रय शिंदे यांचा लढ्यात सहभाग
कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ दत्ता अनंत शिंदे (वय ९६) यांचे शुक्रवारी सकाळी गोवा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी माणिक, मुलगे प्रकाश, किरण, मुलगी सरिता चव्हाण व सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिंदे हे गेल्या महिन्याभरापासून मुलगी सरिता अजित चव्हाण यांच्याकडे गोवा येथे राहत होते. तेथेच शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सायंकाळी येथील टाकाळ्यातील ताराराणी विद्यापीठाशेजारील निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांसह मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिंदे यांचा जन्म रविवार पेठेत झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींच्या बरोबर लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्याच्या विविध आंदोलनांत सहभाग घेऊन ब्रिटिशांविरोधात रान उठविले. त्यांना १९४३ ते १९४६ या कालावधीत ३ वर्षे ६ महिने तुुरुंगवास भोगावा लागला. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करून विक्रम हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. ते कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा शासनासह विविध संस्था व संघटनांकडून अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, कामगार क्षेत्रात भरीव काम केले आहे. कुष्ठरोग निवारण, रॉकेलवाल्यांसाठी संघ स्थापन, महापालिका कामगारांची संघटना अशा ठळक बाबींचा यामध्ये समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना विशेष पेन्शन सुरू केली होती; परंतु ती नाकारून त्यांनी त्याबदल्यात गांधी अध्यासन सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्यामुळे आताचे अध्यासन सुरू झाले. या माध्यमातून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गांधी विचारांच्या प्रसाराचे कार्य केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, हरिभाऊ लिमये, जयप्रकाश नारायण, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रकांत पाटगांवकर, जयवंत मटकर, आदी थोर व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी यांच्याबरोबर दत्तात्रय शिंदे यांचा लढ्यात सहभाग
शिंदे यांना १९४३ ते १९४६ दरम्यान ३ वर्षे ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला.
संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले