‘कृष्णा’वर वर्चस्वासाठी बड्या नेत्यांच्या खेळ्या

By admin | Published: April 16, 2015 11:00 PM2015-04-16T23:00:01+5:302015-04-17T00:11:40+5:30

जयंत पाटील तटस्थ : विलासकाका उंडाळकर, पतंगराव कदम यांच्या भूमिकेला महत्त्व

Senior leaders play for Krishna | ‘कृष्णा’वर वर्चस्वासाठी बड्या नेत्यांच्या खेळ्या

‘कृष्णा’वर वर्चस्वासाठी बड्या नेत्यांच्या खेळ्या

Next

अशोक पाटील -इस्लामपूर -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिन्ही गटांनी पहिल्या फेरीतच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत, तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वरचष्मा ठेवण्यासाठी माजी आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर आणि आ. पतंगराव कदम यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे, तर आमदार जयंत पाटील तटस्थ आहेत. या तिन्ही माजी मंत्र्यांच्या राजकीय खेळ्या अंतिम टप्प्यात काय रूप घेतात, यावर ‘कृष्णा’चा निकाल ठरणार आहे.
‘कृष्णा’च्या सत्ताकारणात कऱ्हाड तालुक्याचे मोठे योगदान आहे. या तालुक्यात २५ हजार सभासद आहेत. या तालुक्यातील विलासकाका उंडाळकरांनी स्वत:च्या गटातील सभासदांच्या जोरावर डॉ. सुरेश भोसले यांना पाठिंबा जाहीर केला आहे, परंतु या दोघांचे मनोमीलन सभासदांना कितपत रुचणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या मनोमीलनावर वाळवा तालुक्यात उलटसुलट चर्चा आहे, कारण विलासकाकांच्या रयत कारखान्याने काही ऊस उत्पादकांची बिले दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. मागील निवडणुकीत विलासकाकांचा गट अविनाश मोहिते यांच्या बाजूने होता. सध्या मात्र कऱ्हाड तालुक्यात अविनाश मोहिते यांची बाजू लंगडी असल्याचे दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हेही कऱ्हाडचेच. त्यांनी डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते यांना पाठिंबा देऊन विधानसभेचा पैरा फेडण्याचा प्रयत्न चालवला आहे, परंतु चव्हाण यांना सहकारी साखर उद्योगाचा अनुभव नाही. शिवाय ग्रामीण भागात त्यांना जनमत नसल्यामुळे त्यांचा कितपत फायदा होणार, याचीही बेरीज-वजाबाकी सुरू झाली आहे. माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या कडेगाव तालुक्यातही ‘कृष्णा’चे कार्यक्षेत्र आहे. त्यांना साखर उद्योगातील मोठा अनुभव असून, त्यांची साथ डॉ. इंद्रजित मोहिते यांनाच आहे. तथापि कडेगाव तालुक्यात केवळ पाच हजार सभासद असल्याने त्यांचाही म्हणवा तितका प्रभाव पडणार नाही, असे बोलले जाते.
अंतिम टप्प्यात डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले, अविनाश मोहिते, विलासकाका उंडाळकर यांची राजकीय आकडेमोड महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत तीन गट उतरले असल्याने वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. मागीलवेळी भोसले गटाचे बहुतांशी कार्यकर्ते अविनाश मोहिते यांच्या गटात सामील झाले होते. यावेळी मात्र पुन्हा ते भोसले गटात परतले आहेत. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते, अविनाश मोहिते यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णाची निवडणूक लढवणाऱ्या सर्व पॅनेल प्रमुखांनी वाळवा तालुक्यावर वर्चस्व असलेल्या आ. जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवले आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत माझी भूमिका तटस्थ राहील. डॉ. पतंगराव कदम, विलासकाका उंडाळकर यांच्या भूमिकेविषयी आपले काहीही मत नाही. राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून चार कारखाने चालविले जात आहेत. साखर उद्योग अडचणीत आल्याने हे कारखाने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ‘कृष्णा’त आम्हाला कसलाही रस नाही. आमचे कार्यकर्ते तिन्ही गटात कार्यरत आहेत. मी कोणत्याही कार्यकर्त्यावर दबाव आणणार नाही.
- आ. जयंत पाटील, माजी ग्रामविकासमंत्री



नाईकांचे कार्यकर्ते भोसलेंच्या गोटात
शिराळा तालुक्यातील भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे वाळवा तालुक्यातील ४८ गावात वर्चस्व आहे. डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले भाजपमध्ये असल्याने आमदार नाईक यांचे कार्यकर्ते भोसले यांच्या गोटात जाऊन प्रचार करू लागले आहेत.

Web Title: Senior leaders play for Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.