ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:17 AM2019-12-20T11:17:12+5:302019-12-20T11:19:04+5:30
ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. जाधव यांच्या निधनामुळे करवीरनगरीतील कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. जाधव यांच्या निधनामुळे करवीरनगरीतील कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
वयोमानानुसार जाधव सध्या फार बाहेर पडत नव्हते. मात्र, गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जाधव यांचे कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्यांनी येथेच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावर ३३ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. चित्रकार रा. शि. गोसावी व रवींद्र मेस्त्री यांचा सहवास त्यांना मार्गदर्शक ठरला. अनेक राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या.
कोल्हापूर, नागपूर येथील कलासंग्रहालयाबरोबरच नॅशनल आर्ट गॅलरी नवी दिल्ली येथे त्यांच्या कलाकृती विराजमान आहेत. वास्तववादी ते सृजनात्मक व अमूर्त शैली, टेराकोटामध्ये त्यांच्या कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. रेखांकनातील त्यांचे सातत्य हे वाखाणण्याजोगे होते. अमेरिका, कॅनडा, नायजेरियासह देशातील मान्यवरांच्या संग्रही त्यांच्या कलाकृती आहेत.
१८ जून १९७८ रोजी जाधव यांनी ‘रंगबहार’ या संस्थेची स्थापना केली. जयप्रभा स्टुडिओ येथे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या हस्ते आणि चित्रकार, शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्या प्रेरणेने हे व्यासपीठ अस्तित्वात आले. आज त्याला ४१ वर्षे झाली आहेत.
शेकडो कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे ही संस्था साऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात लौकिक मिळवून आहे. ‘मैफल रंगसुरांची’ या उपक्रमाद्वारे नव्या-जुन्या कलारत्नांना त्यांनी मंचावर आणले. प्रत्येक वर्षी १६ जानेवारीनंतर पहिल्या रविवारी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिदिनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.