जेष्ठ कवी विलास माळी यांच्या पत्नी मृतावस्थेत आढळल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:01 AM2023-07-26T00:01:09+5:302023-07-26T00:01:26+5:30
सोमवारी सकाळपासून होत्या बेपत्ता, सीमाभागात हळहळ
राम मगदूम, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर): सोमवारी सकाळी कुणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडलेल्या जेष्ठ कवी विलास माळी यांच्या पत्नी योगिता (वय ५०, रा. एस.टी. कॉलनी गडहिंग्लज) या येथील हिरण्यकेशी नदीघाटानजीकच्या श्री नंजुडेश्वर मंदिरासमोरील हिरेमठ यांच्या ऊसाच्या शेतात मंगळवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे गडहिंग्लजसह सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,चन्नेकुप्पी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी माळी हे येथील एस.टी. कॉलनीत कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा मुलगा आशिष हा नोकरीनिमित्त बाहेरगावी असून मुलगी क्षितीजा हिचा विवाह झाला आहे. त्यामुळे घरी सध्या पती-पत्नी दोघेच राहत होते. गेल्या कांही वर्षांपूर्वी योगिता यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती.त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.दरम्यान,सोमवारी (२४) सकाळी साडेसातच्या सुमारास योगिता या काही न सांगता घरातून बाहेर पडल्या होत्या. उशीरापर्यंत त्या घरी न परतल्यामुळे नातेवाइकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, सायंकाळपर्यंत त्यांचा शोध न लागल्यामुळे त्या बेपत्ता झाल्याची तक्रार माळी यांनी पोलिसात दिली होती.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पूर पाहण्यासाठी गेलेल्या तरूणांना नंजुडेश्वर मंदिरासमोरील ऊसाच्या शेतात एक महिला मृतावस्थेत आढळून आली.त्यांनी यासंदर्भात पोलिसांना कळविले.माळी यांनी तो मृतदेह योगिता यांचा असल्याचे सांगितले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.