ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:05 PM2018-12-27T18:05:21+5:302018-12-27T19:18:20+5:30

शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यावर्षीच्या प्रतिष्ठेच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Senior thinker N. D. Patil's' Principal Ra. Krus Kanabkar Award ' | ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कार

ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ पुरस्कारशिवाजी विद्यापीठाकडून गौरव; १२ जानेवारीला वितरण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील  यांना या वर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. त्याचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांच्या हस्ते दि. १२ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व पुरस्कार निवड समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याचा, योगदानाचा सन्मान करण्यासाठी विद्यापीठातर्फे त्यांना ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

विद्यापीठ आणि शालिनी कणबरकर यांच्यातील सामंजस्य करारानुसार विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची निर्मिती केली आहे. भाषा, साहित्य, शास्त्र, सामाजिक व नैसर्गिक, कला, क्रीडा, समाजसेवा, सामाजिक हिताचे लक्षणीय काम करणारी व्यक्ती अथवा संस्थेच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जातो. 

 ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी प्रा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता, शिक्षण या क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा खूप मोठा आहे. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, निवड समितीचे सदस्य प्राचार्य बी. एन. खोत, आदी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका

विद्यापीठाच्या जडणघडणीत प्रा. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६ मध्ये डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

पहिल्यांदाच असा योग

प्रा. पाटील यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्याचा योग पहिल्यांदाच विद्यापीठाच्या माध्यमातून आला आहे. त्यामुळे पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त होणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title: Senior thinker N. D. Patil's' Principal Ra. Krus Kanabkar Award '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.