ज्येष्ठ वस्ताद रंगराव ठाणेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 04:37 PM2020-04-10T16:37:58+5:302020-04-10T17:03:13+5:30
मार्केट यार्ड येथील शाहू कुस्ती आखाड्याचे वस्ताद रंगराव ठाणेकर (वय ७५) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी होणार आहे. मुळचे शाहूवाडी तालुक्यातील बजागवाडी येथील असलेले वस्ताद ठाणेकर यांनी अनेक दिग्गज मल्ल घडविले आहेत.
कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील शाहू कुस्ती आखाड्याचे वस्ताद रंगराव ठाणेकर (वय ७५) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी होणार आहे. मुळचे शाहूवाडी तालुक्यातील बजागवाडी येथील असलेले वस्ताद ठाणेकर यांनी अनेक दिग्गज मल्ल घडविले आहेत.
काळाईमाम तालीम येथे वस्ताद ठाणेकर यांनी मल्लविद्येचे धडे गिरविले. आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी राज्यासह परराज्यातील अनेक मैदाने गाजविली. उत्तर भारतीय मल्लांविरोधात लढणारा कोल्हापूरचा वाघ म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी दोनवेळा महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबही पटकाविला होता.
तर आघाडीचा मल्ल भारत केसरी राकेश पाटील, महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, रमेश पुजारी, महेंद्र देवकाते, आदी मल्लांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली येथील मल्लांना ते मार्गदर्शन करण्यासाठी रोज आखाड्यात हजेरी लावत असत. विशेष म्हणजे विनामानधन त्यांनी मल्लविद्येची सेवा केली.