जयसिंगपुरात हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:14+5:302021-03-22T04:22:14+5:30

जयसिंगपूर : येथील डॉ. सतीश पाटील यांच्या पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली. जयसिंगपूर पोलिसांची कुमक आणि ...

Sensation of a bomb-like object at a hospital in Jaysingpur | जयसिंगपुरात हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तूने खळबळ

जयसिंगपुरात हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तूने खळबळ

googlenewsNext

जयसिंगपूर : येथील डॉ. सतीश पाटील यांच्या पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली. जयसिंगपूर पोलिसांची कुमक आणि कोल्हापूर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संपूर्ण तपासणी केल्यानंतर हा बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारचे कृत्य कोणी केले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, बॉम्बसदृश वस्तूने हॉस्पिटल उडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी (दि. १९) एका व्यक्तीने पायोस हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर एक पिशवी ठेवली होती. या पिशवीत वरच्या बाजूला केळी होती. त्यामुळे ही पिशवी हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णाची असावी, असे समजून एका महिला कर्मचाऱ्याने ही पिशवी त्याचदिवशी हॉस्टिपलमध्ये ठेवली होती. रविवारी सकाळी साफसफाई करीत असताना या पिशवीला धक्का लागल्यानंतर त्यातून घड्याळाचा ‘बीप बीप’ असा आवाज येऊ लागल्याने ती घाबरली व तिने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला याची कल्पना दिली.

यानंतर कर्मचाºयांनी ही पिशवी हॉस्पिटल जवळील मोकळ्या जागेत फेकून दिली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केल्यानंतर बॉम्ब शोध व नाशक, श्वॉन व ठसेतज्ञाला पाचारण करण्यात आले. मात्र, सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर बाँब नसल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तपासणी केली असता प्लॅस्टिकच्या पाईप, वायर आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य मिळून आले. लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, या बॉम्बमध्ये स्फोटक मिश्रीत घटक नसल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी सांगितले.

चौकट - संशयीताचे धागेदोरे

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रिक्षातून आलेल्या एका व्यक्तीने ही पिशवी ठेवल्याचे तपासात पुढे आले आहे. मात्र, चेहरा दिसत नसल्याने अन्य सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासयंत्रणा गतीमान करण्यात आली आहे.

चौकट - अन् मोठी घटना घडली असती जयसिंगपुरमधील या रुग्णालयात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. बॉम्बसदृश्य वस्तू मिळून आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, खरोखरच बॉम्ब अथवा स्फोटक वस्तूचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, कोणतीही स्फोटक वस्तू नसल्याने पुढील अनर्थ टळला.

फोटो - २१०३२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळ - ०५) जयसिंगपूर येथे बॉम्बसदृश्य वस्तू पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या. ०६) जयसिंगपूर येथे बॉम्बसदृश्य वस्तूमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ मिळून आला नाही. यावेळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी पाहणी केली.

Web Title: Sensation of a bomb-like object at a hospital in Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.