‘सनातन’च्या धमकी देणाऱ्या पत्राने खळबळ

By admin | Published: January 5, 2016 01:15 AM2016-01-05T01:15:13+5:302016-01-05T01:15:13+5:30

पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शी मुलाबद्दल उल्लेख; ‘हिट अँड रन’चा संदर्भ

Sensational threatening letter to 'Sanatan' | ‘सनातन’च्या धमकी देणाऱ्या पत्राने खळबळ

‘सनातन’च्या धमकी देणाऱ्या पत्राने खळबळ

Next

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे परंतु अप्रत्यक्षरीत्या त्याच्या कुटुंबीयांना भीतीने धडकी भरेल अशा आशयाचे धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे. या पत्रातील मजकूर वाचून ‘सनातन’ला पोलिसांना जागे करायचे आहे की साक्षीदारावर दबाव टाकायचा आहे, अशी शंका उपस्थित होत आहे. या पत्रामुळे संबंधित मुलाच्या पालकांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता आहे.
‘सनातन’च्यावतीने अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले आहे. ते दि. १२ डिसेंबर २०१५ चे आहे. हे पत्र पोलीस निरीक्षकांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना दि. ३० डिसेंबरला पाठविले. त्यावर पोलीस अधीक्षकांनी तुम्ही या पत्राबाबत काय कार्यवाही केली, यासंबंधीचा उलट टपाली अहवाल द्यावा, असे कळविले
आहे. एका अत्यंत संवेदनशील खटल्यातील तितक्याच गंभीर पत्राबाबत पोलिसांनी दाखविलेली बेफिकिरी त्यातून उघड
होत आहे.
या पत्रात असे म्हटले आहे की, ‘पानसरे हत्याप्रकरणात प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलगा साक्षीदार आहे. त्याच्या जीवितास काही बरे-वाईट झाले तर त्याचे खापर ‘सनातन’ संस्थेवर फोडले जाऊ नये यासाठी त्यास पुरेसे पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे. हा मुलगा सकाळी क्रिकेटच्या सरावास जातो. त्यानंतर तो खासगी ट्युशनला जातो. तिकडून आल्यावर तो शाळेस जातो व सायंकाळी पुन्हा क्रिकेटच्या सरावास जातो, असा त्याचा दिवसभरातील दिनक्रम पत्रात दिला आहे म्हणजे तो कुठे जातो, काय करतो हे आम्हाला चांगले माहीत आहे, असेच या पत्रातून सुचवायचे आहे की काय, अशी भीती पालकांच्या मनातही आहे.
पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर कोल्हापुरातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दि. १४ डिसेंबर २०१५ तारखेला दोषारोपपत्र दाखल झाले आहे. पुनाळकर हे गायकवाड याचे वकील आहेत. त्यांनी लगेचच १५ डिसेंबरला हा खटला कोल्हापुरात चालवू नये, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे आणि या दोन्ही गोष्टी होण्याच्या आधीच हे पत्र त्यांनी पोलीस ठाण्यास पाठवून दिले आहे.
पानसरे यांच्यावर दि. १६ फेब्रुवारी २०१५ ला ते सकाळी ‘मॉर्निंग वॉक’हून परत येत असताना कोल्हापुरातील सागरमाळ परिसरातील त्यांच्या निवासस्थानासमोरच गोळ््या झाडण्यात आल्या. त्यामध्ये त्यांचा दि. २० फेब्रुवारीस मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी उमा यादेखील या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या परंतु त्यांच्या मेंदूला इजा पोहोचल्याने त्यांना या हल्ल्याबाबत काहीच आठवत नाही. प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलगा हा हल्ला झाला त्याच्या समोरच असलेल्या सरस्वती चुनेकर विद्यामंदिरात शिकतो.
तो त्यादिवशी सकाळी सायकलीवरून शाळेजवळ गेला असता मारेकऱ्यांची मोटारसायकल त्याच्या सायकलीस धडकल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर त्या परिसरातील अनेक लोकांचे पोलिसांनी जबाब घेतले परंतु त्यातील कुणीच मारेकऱ्यांबद्दल फारशी माहिती दिली नव्हती; परंतु या मुलाच्या पालकांनी धाडस करून मुलाने जे पाहिले ते पोलिसांना सांगितले आहे.
या खटल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची दि. ७ आॅक्टोबर २०१५ ला कळंबा कारागृहात ओळख परेड झाली त्यामध्येही या मुलाने गायकवाडला ओळखले आहे. सध्या तरी हा एकटाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने या खटल्याचे भवितव्य त्याच्या साक्षीवरच अवलंबून असल्याने एकाबाजूला त्याच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करतानाच अप्रत्यक्षरित्या दबाव टाकणारे हे पत्र आहे.
सलमान व रवी पाटील
या पत्रात सलमान खानच्या गाजलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचाही संदर्भ देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणात कॉन्स्टेबल रवी पाटील हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याच्या मृत्यूनंतर या खटल्याचे पुढे काय झाले हे सर्वांना माहीतच आहे. पत्रात या प्रकरणाचा संदर्भ हा जाणीवपूर्वक मानसिक दबाव टाकण्याच्या हेतूनेच केला असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.
पालकांनी नाकारला पोलीस बंदोबस्त
संबंधित मुलाच्या संरक्षणासाठी पोलीस देऊ का, अशी विचारणा राजारामपुरी पोलिसांकडून करण्यात आली आहे. परंतु, शाळकरी मुलाच्या सुरक्षेसाठी पोलीस कॉन्स्टेबल ठेवल्यास त्यालाही ते अडचणीचे ठरणार आहे. त्याच्या मनावरही त्याचा परिणाम होईल, या भीतीने पालकांनी त्यास नकार दिला आहे.
पोलिसांची टोलवाटोलवी!
यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती तुम्ही स्थानिक अधिकाऱ्यांकडूनच घ्यावी, असे स्पष्ट केले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते वार्षिक तपासणी कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. मोबाईलवर त्यांच्याकडून मिटिंगमध्ये असल्याचा प्रतिसाद आला. मेसेज पाठविला तरीही त्यांचा रिप्लाय आला नाही. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी आपल्याला यातील काही माहीत नसल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Sensational threatening letter to 'Sanatan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.