इचलकरंजीत गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:51 PM2018-04-01T23:51:01+5:302018-04-01T23:51:01+5:30
इचलकरंजी : खंडणी, लूटमार, खून, मारामारी, वाटमारी असे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या परिसरातील पाच टोळ्यांवर इचलकरंजी पोलीस दलाने मोक्का (संघटित गुन्हेगारी) कायद्यानुसार कारवाई केली. आणखीन दोन टोळ्या प्रस्तावित आहेत. या कारवाईमुळे शहर परिसरात पसरलेले गुन्हेगारीचे जाळे उजेडात आले असले तरी गुन्हेगारी क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. पोलिसांचे हे काम स्तुत्यच आहे. मात्र, शहरातील उजळ माथ्याने फिरणाºया व्हाईट कॉलरच्या टोळ्यांवरही अशी कडक कारवाई होणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अमोल माळी टोळी, पी. आर. बॉईज टोळी, जर्मन टोळी, शाम लाखे टोळी व आता मुसा जमादार टोळी अशा पाच टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. या कारवाईमुळे म्होरक्यांसह या टोळ्यांमधील साथीदार चांगलेच धास्तावले आहेत.
ही कारवाई करताना स्थानिक पोलिसांनी अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी पोलीस अधीक्षकांकडे आणि तेथून मंजूर होऊन अंतिम मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला. तेथून तपासणी होऊन त्याला मंजुरी मिळाली. त्यानुसार मोक्का न्यायालयात हजर करून या टोळ्यांवर पुढील कारवाई सुरू आहे.
संघटित गुन्हेगारीअंतर्गत असणाºया या मोक्का कायद्यानुसार कागदपत्रांची पूर्तता होऊन या सर्व टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई होईलच, असे ठामपणे सांगता येत नाही. प्रस्ताव न्यायालयात टिकणे व शिक्षा लागणे, यासाठी पोलीस दलाचा चांगलाच कस लागणार आहे. शिक्षा लागली तर ठीक; अन्यथा पोलीस दलाने प्रयत्न केले होते; पण त्याला यश आले नाही, असे म्हणत पुढे सारवासारव होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातून सुटून जर या टोळ्या बाहेर पडल्या, तर त्यांची दहशत रोखणे पोलिसांना अवघड बनणार आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेत पोलिसांनी लहान-मोठ्या कायदेशीर बाबींची गांभीर्याने पाहणी करून नियोजनबद्धरीत्या पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
मास्टर मार्इंड, पडद्यामागचे सूत्रधार व व्हाईट कॉलर टोळ्यांविषयी बोलताना पोलीस म्हणतात, ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे साथीदार वापरत असल्यामुळे संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणे अवघड बनत असल्याचे सांगितले जाते.
गुन्हेगार डोके लावून नियोजन करत असतील, तर पोलिसांनीही डोके लावून नियोजनबद्धरीत्या त्यांना अन्य मार्गाने का गुंतवत नाहीत, असाही सवाल उपस्थित होत आहे.