वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सेवानिवृत्तांची संवेदनशीलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:44 AM2019-04-27T00:44:49+5:302019-04-27T00:44:54+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘मी व माझं घर’ एवढ्याच वर्तुळात फिरत राहणाऱ्यांच्या भूमिकेला ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘मी व माझं घर’ एवढ्याच वर्तुळात फिरत राहणाऱ्यांच्या भूमिकेला छेद देत कोल्हापुरातील काही सेवानिवृत्तांनी वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आपली कृतिशील संवेदनशीलता दाखवून दिली आहे. संजय कात्रे, प्रसाद चौगुले, सुहास नाईक, शिरीष पुजारी या चौघा मित्रांनी कोल्हापुरातील रस्त्यांच्या डिव्हायडरना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.
संजय कात्रे हे कॉमर्स कॉलेजचे माजी विद्यार्थी. बॅँक आॅफ इंडियात नोकरी करीत होते. त्यांनी बॅँकेतर्फे न्यूयॉर्क येथेही चार वर्षे सेवा केली. मुंबईत त्यांनी व्यवसायही सुरू केला होता. मात्र, घरगुती अडचणीमुळे ते २०१५ साली कोल्हापुरात परत आले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, डिव्हायडरवरील रिफ्लेक्टरअभावी काही ठिकाणी अपघात झाले आहेत, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. रात्रीच्या वेळीही समोरच्या वाहनांच्या दिव्यांचाही त्रास वाहनधारकांना होतो.
कात्रे यांनी याबाबत पोलीस खात्यावर आणि प्रशासनावर अवलंबून न राहता आपण पुढाकार घेतला. त्यांचेच वर्गमित्र उद्योजक प्रसाद चौगुले, महाराष्ट्र बॅँकेतून सेवानिवृत्त झालेले सुहास नाईक, शिरीष पुजारी यांनी आपल्या मित्राला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च महिन्यापासून या सर्वांनी शहरातील डिव्हायडरना रिफ्लेक्टर लावण्याच्या कामाला सुरुवात केली. कात्रे यांनी स्वत: आॅनलाईन रिफ्लेक्टर मागविले आणि आता मुंबईतून त्यांनी आतापर्यंत १५ हजारांहून अधिक किमतीचे रिफ्लेक्टर मागवून घेतले असून, ते लावण्याचे काम सुरू आहे.
रोज सकाळी तास दीड तास हे मित्र काम करीत असून, अनेकांना त्यांचे कौतुक वाटत आहे. काहींनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असून, काहींनी आर्थिक मदतही देऊ केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असताना कात्रे व मित्रांनी घेतलेली ही भूमिका अनुकरणीय आहे, यात शंका नाही. या कामामध्ये आता डॉ. सुनील पाटील, मिलिंद गडकरी यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे.
सहभागाचे आवाहन
या उपक्रमामध्ये ज्या नागरिकांना प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी व्हायचे असेल अशांनी संजय कात्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.