खूनाच्या खटल्यात आरोपीला शिक्षा
By admin | Published: April 25, 2017 05:25 PM2017-04-25T17:25:14+5:302017-04-25T17:25:14+5:30
वाठार तर्फ वडगाव येथील घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर दि. २५: वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे पत्नीशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून शरीफ ईकबाल पटाईत (वय ३५) याच्या खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी आरोपी बालम गुलाब पठाण (३५) याला तीन वर्षाची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. दंडातील ३० हजार रुपये मृताचे पत्नी व लहान मुलगा यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
अधिक माहिती अशी, शरीफ पटाईत व त्यांचा भाऊ रमजान पटाईत यांनी वाठार येथील नवीन घराचे बांधकाम २०१४ मध्ये आरोपीचे वडील गुलाब बाळू पठाण (रा. पोखले, ता. पन्हाळा) यांना दिले होते. यातून बालम व शरीफ यांची ओळख झाली. त्यानंतर काही महिन्यांनी घराच्या बांधकामाच्या आर्थिक व्यवहारातून पठाण व पटाईत या दोन्ही कुटूंबात वाद झाला.
याच मुदतीत शरीफ हा बालमच्या पत्नीचे मोबाईलवर मिस कॉल, फोन करीत असे. ही गोष्ट बालमच्या लक्षात आली. त्याने आपल्या मोबाईलवरुन पत्नीला बोलायला लावून शरीफ हा प्रेमसंबधाने बोलत असल्याची खात्री केली. हे संभाषण मेमरी कार्डवर रेकॉर्डिंग केले. दि. १ जून २०१५ रोजी दूपारी दीडच्या सुमारास बालम हा दूचाकीवरुन शरीफ याचे घरी जाब विचारण्यासाठी आला. याठिकाणी दोघांच्यात बाचाबाची झाली.
बालम याने शरीफ याचे डोके घरातील सिमेंटचे चौकटीवर आपटून त्यास गंभीर जखमी केले. त्यामध्ये शरीफ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत शरीफचा भाऊ रमजान पटाईत यांनी वडगांव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे आरोपी बालम याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.
तत्कालीन परिविक्षा सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधिश कुलकर्णी यांचेसमोर झाली. सहायक सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी गुन्हा सिध्द करण्यासाठी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृताची पत्नी, फिर्यादी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य मानूण आरोपीला शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)