पोलीस अधीक्षकांच्या निरोपाने सहकारी बनले भावनाविवश

By admin | Published: December 10, 2015 01:11 AM2015-12-10T01:11:56+5:302015-12-10T01:31:56+5:30

जीपमधून मिरवणूक : कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार

Sentencing by the Superintendent of Police, sentimentalist | पोलीस अधीक्षकांच्या निरोपाने सहकारी बनले भावनाविवश

पोलीस अधीक्षकांच्या निरोपाने सहकारी बनले भावनाविवश

Next

कोल्हापूर : बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झालेल्या पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांचा बुधवारी पोलीस दलाने कोल्हापुरी फेटा बांधून विशेष सत्कार केला. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सहकाऱ्यांना आपुलकी, जिव्हाळा आणि खंबीर पाठिंबा दिल्याने त्यांना निरोप देताना अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी भावनाविवश झाले. डॉ. शर्मा यांनी १९ फेब्रुवारी २०१४ रोजी कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर राजकीय संघर्ष, फोफावलेल्या अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी टोळ्यांना चाप लावण्यासाठी दंडुक्यापेक्षा कायद्याचा धाक दाखविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. हत्येनंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी समीर गायकवाड या संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. २२ महिन्यांच्या कमी कालावधीमध्ये त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले. साडेसात कोटींचा ‘सीसीटीव्ही प्रकल्प’, महिला मोबाईल पेट्रोलिंग पथक, ‘समाधान योजना’,‘व्हॉट्स अ‍ॅप’ हेल्पलाईन, आदी योजना सुरू केल्या. त्यांची बृहन्मुंबई उपायुक्तपदी बदली झाल्याचे वृत्त समजताच त्यांची बदली रद्द करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. बुधवारी त्यांनी नूतन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे सूत्रे सोपविली. त्यानंतर अलंकार हॉल येथे कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशासनाने त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून विशेष सत्कार केला. जीपमधून त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी आपुलकी, जिव्हाळा आणि खंबीर पाठिंबा दिल्याने त्यांना निरोप देताना अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी भावनाविवश झाले होते.

कोल्हापूरने कधीही न विसरण्यासारख्या आठवणी दिल्या आहेत. प्रेम आणि सन्मान दिला आहे. मी या सर्वांचा ऋणी राहीन.
- डॉ. मनोजकुमार शर्मा
तत्कालीन पोलीस अधीक्षक

Web Title: Sentencing by the Superintendent of Police, sentimentalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.