छोट्या व्यावसायिकांच्या भावना शासनाकडे पोहोचवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:12+5:302021-04-07T04:26:12+5:30
कोल्हापूर : 'ब्रेक द चेन'मधील नियमांबाबत छोटे व्यावसायिक आणि नागरिक यांचे आर्थिक चक्र सुरू राहण्यासंदर्भातील भावना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ...
कोल्हापूर : 'ब्रेक द चेन'मधील नियमांबाबत छोटे व्यावसायिक आणि नागरिक यांचे आर्थिक चक्र सुरू राहण्यासंदर्भातील भावना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शासनाकडे पोहोचविणार आहोत. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण राज्याच्या मुख्य सचिवांसोबत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये छोट्या व्यावसायिकांच्या समस्या मांडाव्यात, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात छोटे व्यावसायिक, रोजंदारी करणाऱ्या लोकांचे मोेठे आर्थिक नुकसान झाले होते. नव्या वर्षात सर्व गोष्टी मार्गावर लागत आहे असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे. नव्या नियमांसंदर्भात अनेक छोट्या व्यावसायिकांनी तसेच दुकानदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवू. तसेच लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
आमदार आसगावकर यांनी बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचे प्रमाण वाढू नये यासाठी ग्राम समिती आणि प्रभाग समिती यांचे काम प्रभावीपणे सुरू करावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासन लोकभावनांचा नक्की विचार करील. ग्राम समिती व प्रभाग समितीबरोबरच प्रत्येक गल्ली, अपार्टमेंट, सोसायटी या ठिकाणीसुद्धा छोट्या समिती करून कोरोना नियंत्रणासाठी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
--
फोटो नं. ०६०४२०२१-कोल-ऋतुराज पाटील
ओळ : आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन छोटे व्यवसाय सुरू ठेवण्यासंबंधीची मागणी केली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होत्या.
.........................