पोटनिवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली टीकास्त्रांची मालिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:53+5:302021-03-28T04:22:53+5:30
बेळगाव : निवडणूक आल्या की, एकमेकांविरोधात नेहमीच राजकारणी टीकास्त्र सोडत असतात. काही वेळा या टीका टोकाला पोहोचतात, तर कधी- ...
बेळगाव : निवडणूक आल्या की, एकमेकांविरोधात नेहमीच राजकारणी टीकास्त्र सोडत असतात. काही वेळा या टीका टोकाला पोहोचतात, तर कधी- कधी या टीका हास्यास्पद आणि मनोरंजन करणाऱ्या ठरतात. बेळगावमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या बेळगाव वाऱ्या सुरू झाल्या आहेत. बेळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेले केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशींनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष हा एखाद्या बसस्टँडप्रमाणे असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
काँग्रेसमध्ये म्हणजे एखाद्या स्टँडप्रमाणे आहे. नंतर या स्टँडचे परिवर्तन बसस्टँडमध्ये आणि बससोबत टेम्पोमध्येदेखील परिवर्तन होते, अशी टिप्पणी प्रल्हाद जोशींनी केली. राज्यात तीन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होईल, असा ठाम विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. बेळगावमधून निवडणूक लढविणाऱ्या मंगला अंगडी यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.
राजकारण्यांसाठी नैतिकता महत्त्वाची : जारकीहोळी प्रकरणावर निसटती प्रतिक्रिया
भारतीय जनता ही नेहमीच इतरांना आदर्शवत ठेवून जगते. मग ते राजकारणी असोत किंवा सुपरस्टार! आपल्याकडे जनता पाहते. आपला आदर राखते यासाठी राजकारण्यांनी आणि सामाजिक स्तरावरील सर्व मान्यवरांनी आपली पत आणि नैतिकता राखणे महत्त्वाचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. आज बेळगाव दौऱ्यावर आलेल्या प्रल्हाद जोशींनी प्रसारमाध्यमांसमोर हे मत व्यक्त केले आहे.
बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाविषयी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जनता राजकारण्यांना विशेष आदर देते. जनता आपले अनुकरण करते. यामुळे जनमानसात शोभेल आणि आदर्शवत वाटेल, असेच प्रत्येक लोकप्रतिनिधीने वागणे गरजेचे आहे. या प्रकरणाबद्दल मी अधिक काही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी विषय टाळला. यासोबतच आरोग्यमंत्री के. सुधाकर यांच्या ‘एकपत्नीत्व’ या वक्तव्याचेही त्यांनी खंडन केले. सध्या बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या सर्व प्रकरणांचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या विकासाची दखल जनता घेईल आणि याची दखल घेऊन भाजप उमेदवाराला नक्की यश मिळवून देतील, असा विश्वासदेखील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखविला.