ज्योत्स्ना शिंदे यांच्या विरोधात गंभीर तक्रारी

By admin | Published: February 10, 2017 11:53 PM2017-02-10T23:53:58+5:302017-02-10T23:53:58+5:30

आर्थिक व्यवहार : समितीकडून चौकशी सुरू

Serious complaints against Jyotsna Shinde | ज्योत्स्ना शिंदे यांच्या विरोधात गंभीर तक्रारी

ज्योत्स्ना शिंदे यांच्या विरोधात गंभीर तक्रारी

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी त्या चौकशीच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांची चौकशी होणार असे कळताच तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात त्यांच्याविरोधात शंभराहून अधिक गंभीर तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशानुसार चौकशी समितीने शिंदे यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाचा जिल्हा परिषद प्रशासनाशी तसा थेट संबंध नाही; पण या विभागाचा कारभार गेले अनेक दिवस चर्चेत राहिल्याने जिल्हा परिषदेची नाहक बदनामी झाल्याने हा विभागच हलविण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न सुरू होते. या विभागाचा थेट संबंध शिक्षण संस्थाचालकांशी येत असल्याने येथे कामावरून अनेकवेळा प्रशासन व संस्थाचालकांमध्ये खडाजंगी पाहावयास मिळत होती. त्यामुळे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत रोज एक तरी तक्रार असते. ज्योत्स्ना शिंदे यांचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला. या विभागात मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी होत असल्याच्या उघड चर्चा शिक्षणक्षेत्रात सुरू होत्या. एकूणच कारभाराबद्दलही संस्थाचालक, शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष पाहावयास मिळतो.
वैयक्तिक मान्यतेबाबत वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप करीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनी शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला दिले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली असून, त्यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी शिंदे यांची चौकशी सुरू केल्याचे समजताच त्यांच्याविरोधात तक्रारींचा अक्षरश: पाऊस सुरू झाला. चौकशी समितीपुढे शंभराहून अधिक तक्रारी दाखल झाल्याने चौकशीची व्याप्ती वाढणार हे मात्र निश्चित आहे.


न्यायालयाच्या आदेशालाही टोपली
शिंदे यांनी संस्थाचालक, शिक्षकांना जुमानले नाहीच; पण त्याबरोबरच काही प्रकरणांबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते. त्यालाही केराची टोपली दाखविल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
राजकीय दबावासाठी यंत्रणा सक्रिय!
चौकशीची प्रक्रिया सुरू झाल्याने शिंदे चांगल्याच धास्तावल्या आहेत. त्यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ही कारवाईच होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबावाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर जिल्हा परिषदेत होती.

Web Title: Serious complaints against Jyotsna Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.