Kolhapur: एसएससी बोर्डाने विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉल तिकीटावर गंभीर चुका; विद्यार्थी, पालकांत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:13 PM2024-03-01T12:13:52+5:302024-03-01T12:13:52+5:30
आज शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे.
कोपार्डे: आज शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाकडून देण्यात आलेले हॉल तिकीटात (रिसिट) अनेक चुका आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकात संभ्रम निर्माण झाला असून याबाबत शाळेकडे चौकशी केली जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणून विषय संपवताना दिसत आहेत.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटावर एसएससी बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकात विषय, उत्तर देण्याची भाषा व तारीख व वेळ असे रकान्यात आहेत या वेळापत्रकात पहिली चूक उत्तर देण्याची भाषा (अन्सर ऑफ लँग्वेज) या रकान्यात मध्ये आहे. हिंदी भाषेच्या विषयासाठी उत्तराची भाषा (अन्सर ऑफ लँग्वेज) हिंदी असायला हवी होती. पण या रकान्यातमध्ये हिंदी ऐवजी मराठी आहे. अशीच चूक इंग्लिशच्या विषयाच्या उत्तराच्या भाषेच्या रकान्यात झाली असून ‘इंग्लिश’ ऐवजी ‘मराठी’ असे आहे.
तारखेच्या रकान्यातही मोठी चूक झाली आहे. हिंदीचा पेपर ७ मार्चला होणार आहे. पण तारखेच्या रकान्यात ९ मार्च तारीख आहे तर इंग्लिश पेपरच्या तारखेच्या रकान्यात ७ मार्च आहे. विशेष म्हणजे हिंदीचा पेपर ७ तारखेला तर इंग्लिशचा पेपर ९ मार्चला आहे. याबाबत पालकांच्यात संभ्रम निर्माण झाल्याने प्रस्तुत प्रतिनिधींनी एका शाळेच्या प्राचार्यांना याबाबत विचारले असता ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणून एसएससी बोर्डाच्या चुकीवर पडदा पाडला. एका पालकाने आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर जर विद्यार्थ्यांची चूक झाली असती तर बोर्ड माफ करेल काय?असा सवालही उपस्थित केला.