विषाची परीक्षा घेतायत सर्पमैत्रिणी!

By admin | Published: September 24, 2014 11:19 PM2014-09-24T23:19:34+5:302014-09-25T00:25:05+5:30

पाचजणींचा ग्रुप : सापांना वाचविण्यासाठी होतायत प्रयत्न

Serpent maternal examination of poison! | विषाची परीक्षा घेतायत सर्पमैत्रिणी!

विषाची परीक्षा घेतायत सर्पमैत्रिणी!

Next

संजय पाटील - कऱ्हाड -पोरी भित्र्या असतात, असं म्हटलं जात़ अगदी एखादी पाल किंवा झुरळही त्यांना घाबरवू शकतं, असंच बहुतेकांच मत; पण कऱ्हाडच्या पोरींनी भित्रेपणाचा हा समज साफ खोटा ठरवलाय़ या मुलींनी चक्क सर्पांशी दोस्ती केलीय़ सर्पविश्वाचा या पोरी जवळून अभ्यास करतायत़ विषारी सर्प हाताळतायत़ सर्पांच्या दुर्मीळ होत असलेल्या प्रजाती वाचविणे, हाच त्यांचा त्या पाठीमागील उद्देश़ -मलकापुरातील माधुरी काळे, नीलम देसाई, नीता बाबर, नीलम शिंदे, काजल पवार या पाचजणींच्या ग्रुपने काही वर्षांपूर्वी विषाची परीक्षा घ्यायचं ठरवलं़ किड्या, मुंगीसारखे मारले जाणारे सर्प वाचविण्यासाठी प्रयत्न करायचा निर्णय या ग्रुपने घेतला़ माधुरी ही या ग्रुपची लिडऱ साप म्हटलं की अनेकांच्या काळजात जसं धस्स होतं, तसंच माधुरीलासुद्धा सुरुवातीला सर्पांविषयी प्रचंड भीती होती़ ही भीती घालविण्यासाठी तिने सर्पांविषयीची पुस्तके चाळण्यास सुरुवात केली़ पुस्तकी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर विषारी, बिनविषारी सर्पांविषयीचा अभ्यास तिने सुरू केला़ काही सर्पमित्रांना भेटून सर्प पकडण्याच्या पद्धतीही आत्मसात केल्या़ या जुजबी ज्ञान व प्रशिक्षणानंतर जेव्हा प्रात्यक्षिकांची वेळ आली, तेव्हा माधुरीने भीतभीत पहिल्यांदाच सर्प पकडण्याचे धाडस केले़ त्यानंतर एक-एक करीत आणखी मैत्रिणी तिने सोबत घेतल्या़
नीलम देसाई, नीता बाबर, नीलम शिंदे, काजल पवार या चार मैत्रिणींनाही माधुरीने सर्पांविषयीची माहिती देण्यास सुरुवात केली़ सापांविषयी त्यांच्या मनामध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी माधुरीने प्रयत्न चालविले़ त्यासाठी तिला सर्पमित्र संजय देसाई व गणेश काळे या सर्पमित्रांनी मदत केली़

सर्पमित्रांकडून होतात कॉल फॉरवर्डमाधुरीसह तिच्या चारही मैत्रिणी सर्प हाताळण्यात सराईत झाल्यानंतर संजय देसाई व गणेश काळे या सर्पमित्रांनी त्यांना कॉल फॉरवर्ड करण्यास सुरुवात केली़ कऱ्हाडसह आसपासच्या उपनगरात कोठेही सर्प आढळल्याचा फोन आल्यास सर्पमित्रांकडून वेळेनुसार हा कॉल माधुरी व तिच्या मैत्रिणींकडे ‘फॉरवर्ड’ केला जातो़
त्यानंतर माधुरीसह त्यांचा ग्रुप सर्प आढळलेल्या ठिकाणी पोहोचतो़ सर्पाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतो़ हे काम फार जोखमीचे असते़ माधुरीने धामण, दिवंड, गवत्या, कुकरी, तस्कर, कवड्या, सोनसर्प, डुरक्या हे बिनविषारी तर नाग, मण्यार, घोणस, पोवळा आदी विषारी सर्पही पकडले आहेत़

सापांविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत़ हे गैरसमज दूर करून सापांना वाचविण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे़ सध्यातरी आम्ही पाच मुली यासाठी झगडतोय; पण मुलींमधील सापांविषयीची भीती दूर करून ग्रुपची सदस्यसंख्या वाढविण्याचा, मुलींना धाडसी बनविण्याचा आमचा मानस आहे़
- माधुरी काळे

Web Title: Serpent maternal examination of poison!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.