‘बिनविरोध नरेवाड’साठी चाकरमान्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:36+5:302020-12-27T04:17:36+5:30
गडहिंग्लज : ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख-दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानी मंडळी जन्मगावी येतात. परंतु, ...
गडहिंग्लज : ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख-दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानी मंडळी जन्मगावी येतात. परंतु, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नरेवाडीच्या प्रमुख मंडळींनी गेल्या आठवड्यापासून गावात तळ ठोकला आहे. ते केवळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणूनच.
नरेवाडी..! हे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील एक गाव. प्रामुख्याने शिक्षक, पोलीस आणि सैन्यदलात नोकरी करणाऱ्यांची संख्या गावात अधिक आहे. त्यांनीच आता गावच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलला आहे. किंबहुना त्यासाठीच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.
याकामी विद्यमान सरपंच चंदाबाई निलवे, गुंडू हमाल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रनाथ पाटील, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त विजय कदम, इंजिनिअर दत्ताराम पाटील व सुधीर पाटील, शिक्षक नेते मधुकर येसणे व विनायक पोवार, डॉ. विनय पोवार, सुधाकर पाटील, नारायण पाटील, वसंत पाटील, आनंदा पाटील, आप्पा निलवे, महादेव येसणे, विवेकानंद आस्वले, प्रवीण केसरकर, रवींद्र पाटील, धोंडिबा गोविलकर, भास्कर पाटील, आप्पा पाटील, मारुती कांबळे, सूर्यकांत कोकितकर, सीताराम येसणे, सुरेश पाटील, सुनील आस्वले यांची कमिटी नेमण्यात आली आहे. गावकऱ्यांनी ''''आम्ही नरेवाडी''''करांच्या हाकेला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांसह अजिंक्य क्रीडा मंडळ व सनी स्पोर्ट्स क्लबनेही पाठिंबा दिला आहे.
# चौकटी * इच्छुकांच्या मुलाखती.!
गावाच्या विकासासाठी काय काय करणार ? यासह विविध प्रश्न विचारून कमिटीने इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा ‘हेतू’ जाणून घेतला. नऊ जागांसाठी २४ जणांनी मुलाखती दिल्या. तसेच तरुणाईच्या काय भावना आहेत, हेही जाणून घेण्यात आले. सुमारे ९० महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन कमिटीसमोर आपल्या अपेक्षा मांडल्या.
* उमेदवारांसाठी निकष !
व्यसनमुक्तीसह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न, नोकरी-व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्मशानभूमीसह अन्य प्रलंबित मूलभूत सुविधांचा पाठपुरावा आणि सैन्य व पोलीस भरतीसाठी स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्याचा कमिटीचा संकल्प आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांनाच संधी देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे कमिटीने उमेदवारांसाठी ‘खास निकष’ तयार केले आहेत.
------
# प्रभाग - ३, सदस्य संख्या - ९,
मतदार संख्या - १३९८ ___ # फोटो ओळी # नरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे सध्या श्री. रामलिंग मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू आहे.
(सोबत - नरेवाडी ग्रामपंचायत इमारतीचा फोटो पाठवला आहे.)