कामगारांच्या शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करा
By admin | Published: November 18, 2014 10:24 PM2014-11-18T22:24:58+5:302014-11-18T23:25:11+5:30
‘अवनि’ची मागणी : जिल्हा परिषदेच्या शाळेत सामावून घ्या
कोल्हापूर : जिल्ह्यातील या शैक्षणिक वर्षात वीटभट्टी, ऊसतोड कामगार, खाणकाम आदी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करा, यांसह विविध मागण्यांचे निवेदन आज, मंगळवारी ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना दिले.
‘अवनि’ गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापुरात शाळाबाह्य मुले, बालमजूर तसेच गरीब वंचित व निराधार मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. कष्टकरी, कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून या संस्थेने ३४ वाड्या-वस्त्यांवर शाळाबाह्य मुलांसाठी शाळा चालवल्या. या माध्यमातून संस्थेने तीन हजार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पण अजूनही वीटभट्ट्या, ऊसतोड कामगारांची मुले शाळाबाह्य आहेत. या मुलांचा सर्व्हे करून त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली. यावेळी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, अमोल कवाळे, गोपाळ पटवर्धन, सुलभा माने, सुनीता भोसले, पुष्पा शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अन्य मागण्या अशा...
उदगाव, चिंचवाड, कोथळी, वाकरे, खुपिरे, दोनवडे, सरनोबतवाडी, कोपार्डे वीटभट्टीवरील ३ ते ५ वयोगटांतील मुलांसाठी अंगणवाडी सुरू करावी.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कारखाना कार्यस्थळावर अंगणवाडी सुरू करून त्यांना गणवेश द्यावा.
वीटभट्टी, ऊसतोड कामगार व खाणकाम कामगार यांच्या गरोदर व स्तनदा मातांचा सर्व्हे करून त्यांना पूरक आहार द्यावा
स्थलांतरित ठिकाणावरील ० ते ५ वयोगटांतील मुलांची आरोग्य तपासणी करावी.
येथील मुलांसाठी पाळणाघर सुरू करावे.
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना देताना ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, सुलभा माने, सुनीता भोसले आदी.