‘भाजप’च्या दणक्याने सर्व्हर आॅन

By admin | Published: June 18, 2015 12:01 AM2015-06-18T00:01:56+5:302015-06-18T00:38:13+5:30

सिटी सर्व्हे कार्यालय : कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

The server of the 'BJP' | ‘भाजप’च्या दणक्याने सर्व्हर आॅन

‘भाजप’च्या दणक्याने सर्व्हर आॅन

Next

कोल्हापूर : गेले वीस दिवस सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगत प्रॉपर्टी कार्ड देण्याचे टाळणाऱ्या येथील सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी चांगलेच धारेवर धरले. भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या दणक्यामुळे तातडीने सर्व्हर सुरू झाला.
सिटी सर्व्हे कार्यालयातील गैरसोयीबद्दल आणि तेथे होणाऱ्या सर्वसामान्यांच्या पिळवणुकीबद्दल वर्तमानपत्रांत येणाऱ्या बातम्यांची दखल घेत भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या कार्यालयाच्या अधिकारी सुवर्णा पाटील यांची भेट घेतली.
प्रॉपर्टी कार्ड दिली जात नसल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक अधिकाऱ्यांना विचारत असताना अत्यंत उर्मटपणे उत्तरे दिली जातात. कार्यालयातील सर्व्हेअर कामकाजाच्या वेळेत खासगी कामासाठी बाहेर जात असतात. जागा मोजणी संदर्भात तर अनेक नागरिकांना अत्यंत वाईट अनुभव येत आहेत. लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय इथले एकही काम होत नाही, यासारख्या अनेक तक्रारींचा पाढाच महेश जाधव यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला.
जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रॉपर्टी कार्डवर बेकायदेशीररीत्या केल्या जाणाऱ्या नोंदी पुराव्यानिशी दाखवून दिल्या. तसेच अनेक गैरप्रकार भूमापन अधिकारी सुवर्णा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पाटील यांनी, लवकरच कार्यालयास शिस्त लावण्यात येईल; तसेच सामान्य नागरिकांना चांगली प्रशासकीय सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शिष्टमंडळात नगरसेवक सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे, संजय सावंत, हेमंत आराध्ये, संदीप देसाई, अमोल पालोजी, गणेश देसाई, सयाजी आळवेकर, अशोक लोहोरे, किरण कुलकर्णी, दिग्विजय कालेकर, उमेश निरंकारी, अनिल काटकर, राहुल काळे, राजू मोरे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: The server of the 'BJP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.