सर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:36 PM2020-09-14T17:36:59+5:302020-09-14T17:39:23+5:30

शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत.

Server down annoys first-year students | सर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

सर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

Next
ठळक मुद्देसर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप शिवाजी विद्यापीठाचा पात्रता अर्ज भरण्यात अडचण : मुदतवाढीची मागणी

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत.

कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या प्रथम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत, त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पात्रतेचा अर्ज ऑनलाईन नोंदणी करावयाचा आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यानुसार बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए., बीसीए, आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. त्यासाठी दि. १९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हरची गती अत्यंत संथ आहे. त्यासह वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब लागत आहे. एका अर्जासाठी चार तासांचा वेळ जात आहे. या संकेतस्थळावर मदतीचा पर्यायही उपलब्ध नाही. ड्रॉपडाऊन मेनूही कार्यरत होत नाही. या तांत्रिक अडचणीकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

ऑनलाईन प्रक्रिया १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण होणे आवश्यक आहे. पण, या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. कोरोनामुळे अधिकतर विद्यार्थी हे स्मार्टफोनद्वारेच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील इंटरनेट उपलब्धतेची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे विद्यापीठाने सर्व्हरची गती वाढवावी अथवा अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्रपणे मुदत द्यावी, अशी सूचना काही पालकांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, तांत्रिक अडचण असल्यास ती दूर केली जाईल. विद्यार्थीहित लक्षात घेऊन हे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विद्यापीठाच्या प्रशासनाचा विचार सुरू आहे.

अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्ज नाहीत

विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाची महाविद्यालयांमधील प्रक्रिया पूर्ण केली आहे. पात्रता अर्ज भरण्याची सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना केली आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग अद्याप भरत नसल्याने विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये येत नाहीत. त्यामुळे अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांनी पात्रता अर्ज भरलेले नाहीत. ही स्थिती आणि सर्व्हरबाबतची तांत्रिक अडचण लक्षात घेता, हे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे.
 

Web Title: Server down annoys first-year students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.