एमबीए सीईटी’ परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप
By संदीप आडनाईक | Published: March 26, 2023 12:22 AM2023-03-26T00:22:51+5:302023-03-26T00:23:10+5:30
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या ‘एमएएच एमबीए सीईटी’ परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
कोल्हापूर :
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या ‘एमएएच एमबीए सीईटी’ परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ‘एमएएच एमबीए सीईटी’परीक्षा शनिवारी झाली. सीईटी सेलतर्फे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी (ता.२५) आणि रविवारी (ता.२६) सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे.
ही परीक्षा सकाळी नऊ ते साडे अकरा आणि दुपारी दोन ते साडे चार अशा सत्रात होत आहे. शनिवारी परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन असणे, परीक्षेचा नियोजित कालावधी मागे-पुढे होणे, नियोजित वेळेपूर्वीच परीक्षेचे सर्व्हर बंद होणे, अशा असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागला. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन परीक्षा केंद्रावर हा गोंधळ झाला आहे. दरम्यान, या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील पेपर सोडविण्यासाठी १५० मिनिटे, तर काही विद्यार्थ्यांना १८० मिनिटे मिळाली. परिणामी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापुरातील न्यू पॉलिटेक्निक, प्रयाग चिखली आणि वाठार येथील अशोकराव माने पॉलिटेक्निक इन्स्टिट्युट या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी साडे नऊ वाजता होणारी ही परीक्षा उशिरा सुरू झाल्याने आमची परीक्षा दोन वाजता नियोजित वेळेत सुरू झाली नाही. १२ वाजता रिपोर्टिंग टाईम असताना दोन वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला प्रत्यक्ष पेपर चार वाजता सुरू झाला आणि साडेसात वाजता संपला. आम्हाला १५० मिनिटांचा वेळ मिळाला सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मात्र १८० मिनिटे ज्यादा देण्यात आली.
-अक्षय ढाले , विद्यार्थी, देवकर पाणंद, कोल्हापूर.
आम्हाला उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निक हे केंद्र मिळाले होते. बारा वाजता रिपोर्टिंग टाईम दिला होता, मात्र आमची प्रत्यक्ष परीक्षा चार वाजता सुरू झाली, ती साडेसात वाजेपर्यंत सुरू राहिली. १५० मिनिटाचाच वेळ मिळाला. याशिवाय खराब स्क्रीनचा कॉम्प्युटर आणि माऊस दिल्यामुळे उत्तरे द्यायला वेळ लागत होता.
-श्रेयस निकम, विद्यार्थी, राजारामपुरी, कोल्हापूर.