सरकारी रुग्णालयांत सेवा शुल्क वाढ
By admin | Published: December 30, 2015 12:09 AM2015-12-30T00:09:24+5:302015-12-30T00:25:30+5:30
शासनाचा निर्णय : दरवाढ योग्य; पण चांगल्या सुविधा देण्याची नागरिकांची मागणी -शासकीय रुग्णालयांतील दरवाढ रद्द करा : सतेज पाटील
कोल्हापूर : शासकीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवांमध्ये शुल्कवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी योग्य असली तरीही शासनाने सुविधा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांतर्गत कोडोली, गडहिंग्लज, गांधीनगर, सेवा रुग्णालय (लाईन बझार) व १६ ग्रामीण रुग्णालये येतात. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, १८ वर्षांपर्यंतची मुले-मुली, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समाविष्ट आजार, आदींना मोफत सुविधा दिली जाते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. सध्याचा केसपेपरचा दर पाच रुपयांचा असून, तो दहा रुपये होईल. खासगी रुग्णालयांतील केसपेपरचे दर ५० रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या घरात आहेत.
शासकीय रुग्णालयांतील दरवाढ रद्द करा : सतेज पाटील
कोल्हापूर : सर्व शासकीय रुग्णालयांतील सेवांसाठीचे दर दुपटी-तिपटीने वाढल्याने नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे. सर्वसामान्य जनतेला झळ पोहोचविणारी ही दरवाढ रद्द करावी, असे पत्रक माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आरोग्य विभागातील सर्व शासकीय रुग्णालयांत काँग्रेस आघाडी सरकारने २००१ मध्ये सुधारित दर निश्चित केले होते; परंतु, भाजप-शिवसेना सरकारने दुप्पट-तिप्पट दर वाढविले आहेत. या दरवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना या दरवाढीचा फार मोठा फटका बसणार आहे. उपचाराचे दर १५ वर्षांपासून स्थिर होते. दरामध्ये समानता असावी, असा आघाडी सरकारचा उद्देश होता. भाजप-शिवसेना सरकारने आघाडी सरकारवर महागाई वाढविल्याची टीका केली होती; पण त्यांनी आघाडी सरकारपेक्षा दुपटी-तिपटीने दर वाढविले आहेत. यामुळे
खासगी रुग्णालयांचे दर परवडत नसल्याने उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथेही भरमसाट शुल्क द्यावे लागणार आहे. म्हणून, सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेला आदेश रद्द करावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे पत्रकात म्हटले आहे.
शासनाने शुल्कवाढ केल्याचा आदेश अजून मिळालेला नाही. सध्या ‘सीपीआर’मध्ये शासनाकडून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अथवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधून सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत.
-डॉ. विलास देशमुख, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, कोल्हापूर.
सद्य:स्थितीत शासनाने केलेली शुल्कवाढ योग्य आहे. त्या मानाने आता सर्वसामान्यांना रुग्णालयांनी चांगल्या सेवा द्याव्यात.
- वसंत मुळीक, निमंत्रक, सीपीआर बचाव कृती समिती
खासगीच्या मानाने शासकीय शुल्क दरवाढ योग्य आहे. शासनाने सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात, एवढीच अपेक्षा आहे.
- सुनील करंबे, सदस्य, अभ्यागत समिती
शासनाने शुल्क वाढविले आहे. सद्य:स्थितीत ही वाढ योग्य असली तरी शासनाने या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा रुग्णांना द्याव्यात.
- रवी डांगे, नागरिक
सीपीआर दृष्टिक्षेपात...
(महिन्याभरात सरासरी होणारे उपचार)
विभागसंख्या
बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी)४६,६५३
अंतर्रुग्ण ३२८८
मुख्य शस्त्रक्रिया५८५
किरकोळ शस्त्रक्रिया८३२
प्रसूती३३०
गर्भपात४२
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया५७०
एमएलसी८००