सेवामार्गच गायब, साईडपट्ट्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:16 AM2019-11-16T00:16:59+5:302019-11-16T00:17:38+5:30

या महामार्गावर किणी आणि कोगनोळी टोलनाक्यांवर टोल भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हद्दीत चौपदरीवरून वाहने सुसाट वेगाने धावतात; पण टोल भरल्याच्या बदल्यात या मार्गावर म्हणाव्या तितक्या सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत.

Service lines disappear, sidebars dangerous | सेवामार्गच गायब, साईडपट्ट्या धोकादायक

सेवामार्गच गायब, साईडपट्ट्या धोकादायक

Next
ठळक मुद्देकागल ते किणी : रस्त्यालगत भराव टाकून जागा हडप करण्याचा प्रयत्न; प्रवाशांची सुरक्षा धाब्यावर

तानाजी पोवार।
कोल्हापूर : पुणे-बंगलोर या राष्टÑीय महामार्गावरील कागल ते किणी दरम्यान प्रवाशांच्या सुविधांची वानवाच आहे. प्रवाशांची सुरक्षाही येथे धाब्यावर बसविली आहे. ‘टोल भरा अन् जीव सांभाळा...’ अशीच काहीशी अवस्था या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची बनली आहे. या महामार्गावरील अनेक ठिकाणचे सेवामार्ग गायब असून रस्त्याच्या साईडपट्ट्या धोकादायक स्थितीत आहेत.

धोकादायक वळणे (ब्लॅक स्पॉट), शेतीवाहनांची वर्दळ व उलट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या अधिक, रस्त्याच्या कामांचा निकृष्ट दर्जा अशा परिस्थितीतील कागल ते किणी हा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्टÑीय महामार्गाचा भाग अपघाताला निमंत्रण देणारे ठिकाण बनले आहे. गेल्या पाच वर्षांत या ४८ किलोमीटर अंतरामध्ये झालेल्या वाहन अपघातात तब्बल ९८ जणांचे बळी गेले असल्याची धक्कादायक माहिती आहे; तर काहींनी या महामार्गालगत भराव टाकून व्यवसायासाठी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे.

या महामार्गावर किणी आणि कोगनोळी टोलनाक्यांवर टोल भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हद्दीत चौपदरीवरून वाहने सुसाट वेगाने धावतात; पण टोल भरल्याच्या बदल्यात या मार्गावर म्हणाव्या तितक्या सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. महामार्गावर किरकोळ डागडुजी केल्याचे चित्र असले तरीही या महामार्गावरील साईडपट्ट्या या वाहनधारकांसाठी अधिक धोकादायक बनल्या आहेत. मुख्य रस्ता आणि साईडपट्ट्यांमध्ये पडलेल्या भेगांकडे दुर्लक्ष केल्याने त्या भेगांचे आता खड्ड्यांत रूपांतर होत आहे. त्यामुळे अशा लांबच लांब भेगा साईडपट्ट्यांवर दिसत आहेत. त्यामध्ये गवतही उगवून त्यांची दुरवस्था झाली आहे.


औद्योगिक क्षेत्र...हॉटेल्स... वाहनांची गर्दी
जिल्ह्यातील ४८ किलोमीटर अंतराच्या या महामार्गावर काही मोजक्याच ठिकाणी सेवामार्ग दिसून येतात. महामार्गाशेजारी औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स, पेट्रोल पंप, शेतीक्षेत्र आहे. बहुतांश मार्गालगत सेवामार्गच नसल्याने लहान-मोठी वाहने थेट महामार्गावरून धोकादायक स्थितीत प्रवास करतात. मंगरायाचीवाडी ते अंबपवाडी, अंबप ते किणी यांसह अनेक ठिकाणी महामार्गावर हे सेवामार्गच तयार करण्यात आलेले नाहीत. फक्त मोठ्या गावांत प्रवेश करण्यासाठी अंतर्गत रस्ते काढण्यात आले आहेत.


उड्डाण पूल, वाहतुकीची कोंडी
कागल ते किणी दरम्यान उजळाईवाडी, उचगाव, तावडे हॉटेल, शिरोली, शिये फाटा, वाठार या ठिकाणी उड्डाण पूल आहेत. या सर्व ठिकाणी वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली आहे. तसेच महामार्गावरील मुख्य रस्त्यावरून सेवामार्गावर उतरताना अनेक वाहनांचा अंदाज चुकून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहेत, त्यामुळे वाहनांचे चालक गोंधळतात.


स्थानिक वाहने उलट्या मार्गावर
महामार्गावर सेवामार्गांचा अभाव असल्याने महामार्गालगतच्या अनेक गावांतून थेट महामार्गावर यावे लागते. तसेच महामार्गावर सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरापर्यंत एकसारखा रस्ता दुभाजक असल्याने परिसरातील गावांतून महामार्गावर येणारी वाहने उलट्या मार्गे धोकादायक प्रवास करीत किमान एक-दोन कि.मी.पर्यंत जवळच्या चौकात येऊन पूर्ववत मार्गस्थ होतात. त्यामुळे या उलट्या मार्गे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने आल्याने त्यांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.


शेतीवाहनेही महामार्गावर
महामार्गालगतचा भाग तसा ग्रामीण असल्याने येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच राष्टÑीय महामार्गावर बैलगाड्या, ट्रॅक्टर, ऊस वाहतूक, दुचाकी, आदी वाहनांना येण्यास बंदी आहे; पण सेवामार्गच नसल्याने शेतीवाहनांसह रिक्षा, दुचाकी वाहनेही या महामार्गावरून बिनधास्तपणे मार्गस्थ होत असतात. रात्रीच्या वेळी होणारी ऊस वाहतूकही नेहमी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.

  • 48 कि.मी. कागल ते किणी अंतर
  • 98  पाच वर्षांत बळींची संख्या
  • 16 धोकादायक वळणे


कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील या उड्डाणपुलाखाली वाहनांची सर्वाधिक गर्दी असते. या उड्डाणपुलाखालील रस्ता अरूंद असल्याने तेथे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. येथे पावसाळ्यात पाण्याचे डबके तयार होते तर नेहमी रात्री अंधार व्यापलेला असतो.

Web Title: Service lines disappear, sidebars dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.