रेशन दुकानदारांकडून संकट काळात गोरगरिबांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:12+5:302021-08-29T04:25:12+5:30
कोल्हापूर : कोरोना आणि महापुराच्या संकट काळामध्ये रेशन धान्य दुकानदारांनी गोरगरीब जनतेची सेवा केली, असे प्रशंसाेद्गार ग्रामविकास मंत्री हसन ...
कोल्हापूर : कोरोना आणि महापुराच्या संकट काळामध्ये रेशन धान्य दुकानदारांनी गोरगरीब जनतेची सेवा केली, असे प्रशंसाेद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि कागल तालुकाध्यक्ष संदीप लाटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यावेळी मुश्रीफ यांनी या सर्वांच्या कार्याचे काैतुक केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिलपासून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जे मोफत धान्य वाटप करण्यात आले, त्याचे प्रति क्विंटल १५० रुपये मार्जिनचे पैसे लवकर मिळावेत, मे २०२१ च्या नियमित धान्याचे रोख पैसे भरले आहेत. परंतु, धान्य वाटप करताना शासन आदेशानुसार मोफत वाटप झाले आहे. तरी दुकानदारांनी भरलेली रक्कम परत मिळावी, आपत्कालीन स्थितीमध्ये धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. शिष्टमंडळामध्ये अमोल शेंडगे, कृष्णात बनके, ज्ञानदेव पाटील, श्रीकांत कांबळे, जितेंद्र प्रभावळकर, शंकर घाटगे, मदन पाटील, जयवंत निकम यांचा समावेश होता.
२८०८२०२१ कोल रेशन दुकानदार
कोल्हापुरात रेशन दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि संदीप लाटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.