कागल-सातारा महामार्गाला सर्व्हिस रोड, रखडलेल्या कामाला मंजुरी; अपघातांचा धोका टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 04:03 PM2023-05-12T16:03:03+5:302023-05-12T16:03:25+5:30
सर्वाधिक वर्दळ आणि सर्वाधिक खराब रस्ता
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल ते सातारा (शेंद्रे) दरम्यान १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विस्तारीकरण गतिमान झाले आहे. संपूर्ण मार्गालगत सर्व्हिस रोड केले जाणार आहेत. यामुळे स्थानिकांची सोय होणार असून, अपघातांचा धोका टळणार आहे.
देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक असलेल्या पुणे ते बंगळुरू महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम केवळ सातारा ते कागल दरम्यान रखडले होते. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या कामाला अखेर गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मंजुरी देऊन चार हजार ४७८ कोटींचे टेंडर काढले. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे.
यापूर्वीच्या चारपदरी महामार्गावर अनेक त्रुटी आहेत. कागल ते सातारादरम्यान अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीत. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र थांबे नाहीत. बसस्टॉपची व्यवस्था नाही. सर्व्हिस रोड नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिकांकडून महामार्गावर उलट्या दिशेने वाहतूक केली जात होती. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते.
महामार्गाच्या विस्तारीकरणात सर्व्हिस रोड तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. आराखड्यानुसार १६२ किलोमीटरचे सर्व्हिस रोड होणार आहेत. शिवाय महामार्गालगतच्या गावांना जोडणारे रस्ते, बसथांबे, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र थांबे, पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, पाणी वाहून जाणाऱ्या मोरी केल्या जाणार आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा आणि अधिक गतिमान होणार असून, स्थानिकांचीही सोय होणार आहे. असल्याची माहिती महामार्ग विकास महामंडळाचे अधिकारी वसंत पंदरकर यांनी दिली.
सर्वाधिक वर्दळ आणि सर्वाधिक खराब रस्ता
कागल ते सातारा या महामार्गावर २४ तासांत सुमारे ७० ते ८० हजार वाहने धावतात. औद्योगिक वसाहती, मोठी गावे, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग या महामार्गाला जोडले आहेत. त्यामुळे वाहनांची प्रचंड वर्दळ असते. असे असूनही या मार्गाचे विस्तारीकरण अनेक वर्षे रखडले होते. आता तरी महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे.