चोवीस तासात कामावर हजर न राहिल्यास सेवा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:51 PM2020-12-04T18:51:12+5:302020-12-04T18:53:43+5:30
zp, kolhapurnews कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेचे काम नाकारणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी चोवीस तासात कामावर व्हावे अन्यथा त्यांच्या सेवा संपुष्टात आणाव्यात व त्यांच्या ठिकाणी नवीन आशा स्वयंसेविका नियुक्ती कराव्यात असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवारी रात्री दिला.
कोल्हापूर : कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेचे काम नाकारणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी चोवीस तासात कामावर व्हावे अन्यथा त्यांच्या सेवा संपुष्टात आणाव्यात व त्यांच्या ठिकाणी नवीन आशा स्वयंसेविका नियुक्ती कराव्यात असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवारी रात्री दिला. यासंदर्भात पंचायत समितीकडील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथिमक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकारी यांना तसे आदेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिम दि. १ ते दि. १६ आक्टोबर या कालवधित राबविण्याच्या सूचना आशा स्वयंसेविकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम करण्याऐवजी त्यांनी ते नाकारले आहे.
आशा स्वयंसेविकांना मंजूर झालेले वाढीव मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी सदर मोहिम राबविण्यास स्पष्ट नकार दिला असून तसे निवेदन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कु. क. सोसायटी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले होते. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन राज्यस्तरावरुन अनुदान प्राप्त होताच आशा स्वयंसेविकांचे सर्व थकित मानधन अदा करण्याचे आश्वासन दिले. तरीही मोहिमेत काम करण्यास नकार दिला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून पंचायत समितीकडील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथिमक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आशा स्वयंसेविकांना चोवीस तासात कामावर हजर व्हा अन्यथा त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश काढण्याचे फर्मान सोडले.
अधिकाऱ्यांनी विनापगार काम करावे-
कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन जिल्हा सचिव उज्वला पाटील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमचे कुटुंब प्रमुखच जर कार्यमुक्तीचे आदेश देणार असतील तर ते आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्यावर दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांनी चार महिने पगार न घेता काम करावेत, आमचे मानधन मिळाल्यावरच त्यांनी पगार घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.