मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे सेवा कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:09+5:302021-05-29T04:19:09+5:30
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण ...
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपा कोल्हापूर शहर जिल्ह्यामधील सात मंडलांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य केले जाणार असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली.
चिकोडे म्हणाले, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येणार आहेत. मंडलांमधील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. सार्वजनिक स्वच्छता गृहांची सफाई, कोविड काळजी केंद्रात आयुर्वेदिक, शक्तिवर्धक काढा वितरण, सी.पी.आर.व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे चपाती-भाजी वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
चौकट
हे सर्वजण होणार सहभागी
३० मे रोजी होणाऱ्या कायर्क्रमांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते, भाजपाचे सर्व हितचिंतक या सर्व सेवाकार्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.