२५ हजार स्वयंसेवकांची फौज उभारणार
By admin | Published: September 29, 2016 12:06 AM2016-09-29T00:06:08+5:302016-09-29T00:37:34+5:30
मराठा क्रांती मोर्चा : नियोजनासाठी आज संपर्क कार्यालयात बैठक; निर्णयावर शिक्कामोर्तब करणार
कोल्हापूर : कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला निघणारा मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक ठरावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या मोर्चात शिस्तबद्धपणा असावा यासाठी सुमारे २५ हजार स्वयंसेवकांची फौज उभारली जाणार आहे. या स्वयंसेवकांमध्ये महाविद्यालयीन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे. याशिवाय विविध २२ कमिट्यांद्वारे मोर्चावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कमिट्यांमध्ये अराजकीय तरुणांचा समावेश राहणार आहे. आज, गुरुवारी दुपारी मराठा संघटनांच्या सुमारे ५० पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या कमिट्यांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
स्वयंसेवकपदासाठी अनेकजण स्वयंस्फूर्तीने नोंदणी करत आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. मराठा मोर्चामध्ये एका विशिष्ट रंगाचे टी-शर्ट या स्वयंसेवकांना देण्यात येणार आहेत. आतापर्यंत विविध स्टॉल्सवरून सुमारे ५ हजार टी-शर्ट वितरण करण्यात आले आहेत.
कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चा हा ऐतिहासिक ठरावा यासाठी नियोजनबद्धरित्या जनजागृती केली जात आहे. गाव, गल्ली, तालीम संस्था, शाळा, महाविद्यालयांत मराठा क्रांती मोर्चासाठी जनजागृती करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकामार्फत गेले पंधरा दिवस कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. ‘एक मराठा, लाख मराठा’ हा बाणा घेऊन जास्तीत-जास्त तरुणाईचा सहभाग या मोर्चात असावा यासाठी व्यूहरचना केली आहे. त्यानुसार घरा-घरांत जाऊन मराठा समाजाच्या जागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
संपूर्ण राज्यात आतापर्यंत झालेल्या मोर्चात कमालीचा शिस्तबद्धपणा दिसून आला आहे. प्रत्येकाने स्वत:पासूनच शिस्तबद्धता राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. १५ आॅक्टोबरच्या कोल्हापूरच्या मोर्चातही हा शिस्तबद्धपणा दिसून येणार आहे. त्यासाठी स्वयंसेविकांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाबाबत महाविद्यालयातील जागृतीसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये उमेश पोवार, फत्तेसिंग घोरपडे, अवधूत अपराध, साक्षी पन्हाळकर, मानसी सरनोबत, साक्षी बागल, शिवानी सासने आदींचा समावेश आहे. या पथकाने बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय आदी ठिकाणी जावून जनजागृतीचे काम केले.
महाराष्ट्रात प्रथमच २ जी व्हीडिओ लोगो
संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांत लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत, पण महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरच्या राजारामपुरीतील अजय पाटील या अॅनिमेशन शिक्षकाने मराठा क्रांती मोर्चाचा २ जी व्हीडिओ लोगो तयार केला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर धूम करेल.
कोअर कमिटीची स्थापना
मराठा क्रांती मोर्चाच्या ध्येय-धोरणांसाठी बुधवारी शिवाजी मंदिर येथील मोर्चाच्या संपर्क कार्यालयात मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सायंकाळी बैठक झाली. त्यामध्ये ५० जणांची अराजकीय कार्यकर्त्यांची कोअर कमिटी नेमण्यात आली. या बैठकीत मोर्चातील ध्येय-धोरणांबाबत सखोलपणे चर्चा करण्यात आली. मोर्चाच्या नियोजनासाठी सुमारे २२ कमिट्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या नियोजनासाठी आज, गुरुवारी बैठक घेण्यात येणार आहे.
भगवे झेंडे, स्टीकर्स, बॅनर्स
जागृतीसाठी सुमारे लाखभर स्टीकर्स पहिल्या टप्प्यात तयार करण्यात आले आहेत. हे स्टीकर्स दुचाकी, चारचाकी वाहनांवर चिकटवून जनजागृती करण्यात येत आहे. महाविद्यालयातील तरुणांच्या वाहनांवर हे स्टीकर्स झळकू लागले आहेत. भगवे झेंडे, बॅनर्सही झळकू लागले आहेत.
योगदानात पानपट्टी असोसिएशनही
स्वयंसेवकांच्यामध्ये शहरातील पानपट्टी असोसिएशनचे सुमारे ३०० कार्यकर्ते सहभागी होऊन सेवा बजावणार आहेत. सर्वच स्वयंसेवक मोर्चातील शिस्तबद्धपणापासून मोर्चा संपल्यानंतर पुढील काही वेळात मोर्चा मार्ग आणि ठिकाणावर स्वच्छता मोहीमही राबवतील.